Hit And Run : मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ हिट अँड रन ! मर्सिडीजच्या धडकेत 21 वर्षीय मुलाचा मृत्यू

ठाणे : ठाण्यात एका 21 वर्षीय मुलाला मर्सिडीज कारने धडक दिली, त्यात त्याचा मृत्यू झाला. दर्शन हेगडे असे मृताचे नाव आहे. 20 ऑक्टोबरच्या रात्री ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. दर्शन खाद्य पदार्थांची खरेदी करून घरी परतत असताना हा अपघात झाला. नाशिक महामार्गाकडे जाणाऱ्या मर्सिडीजने त्याला धडक दिली.
अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी कार ताब्यात घेतली, मात्र आरोपी चालक अद्याप फरार आहे. अभिजीत नायर असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. महाराष्ट्रात सहा महिन्यांतील हिट अँड रनची ही चौथी घटना आहे.
पोलिसांनी सांगितले की, नौपाडा पोलिस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम 106 (2), 281 आणि 125 (बी) आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांनुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाजवळ हा अपघात झाला आहे. पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. मात्र, घटनेच्या वेळी परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे काम करत नव्हते.
‘या’ वर्षातील चौथे प्रकरण
1. या वर्षी मे महिन्यात पुण्यात एका 17 वर्षीय मुलाने दोन दुचाकीस्वारांना त्याच्या कारने धडक दिली होती. या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला होता. आरोपी अल्पवयीन हा शहरातील एका मोठ्या बिल्डरचा मुलगा होता.
2. 24 वर्षीय मिहिर शाहने मुंबईत एका महिलेला त्याच्या बीएमडब्ल्यूने धडक दिली होती. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला होता. मिहीर शहा हा शिवसेना नेत्याचा पुत्र आहे.
3. 10 ऑक्टोबरच्या रात्री पुण्यात एका ऑडी कारने फूड डिलिव्हरी बॉयला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला.
4. ठाण्यात एका 21 वर्षीय मुलाला मर्सिडीज कारने धडक दिली.





