राजगुरुनगरमध्ये हिट अॅन्ड रनची घटना; २४ तासानंतरही चालकावर गुन्हा दाखल नाही, पोलिसांच्या भूमिकेवर सवाल

पुणेः पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरमध्ये भीमाशंकर मार्गावर सातकरस्थळ येथे हिट अॅन्ड रनची घटना घडली. एका डॅाक्टरने तीन दुचाकींसह पादचाऱ्यांना चिरडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ही अपघाताची घटना ११ मार्चला रात्रीच्या सुमारास घडली होती. या अपघातामध्ये ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कार चालवणारा चालक डॅाक्टर असून तो दारुच्या नशेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेला २४ तास उलटून गेल्यानंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला जात आहे.
११ मार्च रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. कारचालकाने दुचाकीवरील तिघांना धडक दिली. याचसोबत इतर पादचाऱ्यांनाही धडक दिली आहे. एवढी मोठी अपघाताची घटना घडूनही पोलिसांना याबाबत काहीच माहित नव्हते. तसेच जखमी आणि मोटारचाकाबद्दल आम्हाला काही माहित नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. या घटनेला २४ तास उलटूनही अद्यापर्यंत गुन्हा दाखल करण्यात न आल्याने अपराधाल्या पोलीस पाठीशी घालत आहेत का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कार चालकाने विविध ठिकाणी ९ जणांना धडक दिली आहे. कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या घटनेत तीन जणांच्या पायाची हाडे मोडली आहेत. त्यांची अवस्था गंभीर आहे. चासकडून राजगुरुनगरकडे येणाऱ्या एका कारने दुचाकीस्वारांना धडक दिली. यात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. या घटनेनंतर वाहन चालकाने कार थांबवली नाही. तो पुढे निघून गेला. तीन पादचाऱ्यांना कारने धडक दिली. यामध्ये एकजण गंभीर जखमी आहे, तर दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. या हिट अॅन्ड रनची चर्चा तालुक्यात होत केली जात आहे.





