Hit and Run : शहरात ‘हिट अँड रन’चा हैदोस! वेगाची नशा आणि रक्ताळलेले रस्ते; पोलिसांसमोर मोठे आव्हान
Hit and Run : निकामी सीसीटीव्ही आणि अंधाऱ्या रस्त्यांमुळे फरार चालकांचे फावते; हाय-डेफिनिशन कॅमेऱ्यांची शहरात नितांत गरज.

Hit and Run – शहरातील रस्त्यांवर ‘हिट अँड रन’च्या घटना वाढत आहेत. अपघात करून चालक घटनास्थळावरून पळ काढत आहेत. त्यामुळे जखमींना वेळेत मदत मिळत नाही. दिवसागणिक या अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे समोर आले आहे. हे फरार आरोपी शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. लाखोंच्या घरात वाहने पोहोचली आहेत. मात्र, रस्त्यांची क्षमता तितकी वाढलेली नाही. अनेक अंतर्गत रस्ते अरुंद आहेत. महामार्गावर वाहनांचा वेग जास्त असतो. बेशिस्त पार्किंग आणि लेन कटिंगमुळे धोका वाढतो. मात्र पिंपरी चिंचवड शहरात आणखी वेगात जाण्यासाठी बीआरटी मार्गाचा वापर केला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
यामुळे बस प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. तरुणांमध्ये वेगाची स्पर्धा दिसून येते. धूम स्टाईलने वाहन चालवण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेक वाहनचालक नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत. हेल्मेट, सिग्नल आणि वेगमर्यादा पाळली जात नाही. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळ काढतात. अनेक घटना रात्री घडतात. काही ठिकाणी वर्दळ कमी असते. त्यामुळे साक्षीदार मिळत नाहीत. जखमींना वाहनाचा क्रमांक लक्षात राहत नाही. यामुळे तपासात अडथळे येतात.
शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची स्थितीही चिंताजनक आहे. काही भागांत कॅमेरेच नाहीत. काही ठिकाणी कॅमेरे बंद आहेत. फुटेज स्पष्ट नसते. त्यामुळे वाहन ओळखणे कठीण जाते. तपासाची गती मंदावते. वाहतूक पोलिसांनी कारवाई वाढवली आहे. नियम मोडणाऱ्यांवर दंड आकारला जात आहे.
अतिवेग, सिग्नल जंपिंग आणि हेल्मेट नसल्यावर लक्ष ठेवले जात आहे. मात्र, दंडापुरतेच मर्यादित उपाय पुरेसे ठरत नाहीत. तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे गरजेचे आहे. प्रत्येक मुख्य चौकात हाय-डेफिनिशन कॅमेरे बसवावेत. अंधाऱ्या रस्त्यांवर प्रकाशव्यवस्था सुधारावी. तपासाची व्याप्ती वाढवणे आवश्यक आहे.
दिवसेंदिवस वाढणाऱ्या अपघातांच्या घटनांमुळे पालकांमध्येही चिंता वाढली आहे. अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी दिली जात आहे. यामुळे अपघाताचा धोका वाढतो. पालकांनीही जबाबदारी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे. अशा घटनांमध्ये नागरिकांची भूमिकाही महत्त्वाची असल्याचे मत पोलिस प्रशासनाने व्यक्त केले.
अपघात झाल्यास मदत करावी. पळून जाणाऱ्या वाहनाचा क्रमांक टिपावा. पोलिसांना माहिती द्यावी. थोडीशी जागरूकता जीव वाचवू शकते. शहरातील ‘हिट अँड रन’ च्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. नियमांचे पालन आणि कडक अंमलबजावणी हीच उपाययोजना ठरू शकते.






