गाझा सीमेवर इस्रायलकडून पुन्हा मारा

जेरुसलेम – गाझा पट्ट्यातील पॅलेस्टाईनमधील दहशतवादी ठिकाणांवर इस्रायलकडून आज पुन्हा गोळीबार करण्यात आला. सीमेजवळ झालेल्या उग्र निदर्शनांमध्ये इस्रायलचा एक पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने हा मारा केला.
गाझामधील सत्तारुढ हमासने शनिवारी सीमेजवळ उग्र निदर्शने केली होती. इस्रायल-इजिप्त भूभागाच्या कोंडीकडे लक्ष वेधण्यासाठी हमासने ही निदर्शने घडवून आणली होती. मात्र या निदर्शनांना हिंसक वळण लागले होते.
निदर्शने करणाऱ्या शेकडो जणांनी सीमेवरील कुंपणावर चढन इस्रायली सैनिकांवर मोठे दगड आणि स्फोटके भिरकावली होती. काही ठिकाणी टायर पेटवून काळा धूर करण्यात आला होता. त्या धूराच्या आडून इस्रायली सैनिकांवर दगडफेक केली गेली होती.
इस्रायलने केलेल्या गोळीबारात किमान 24 पॅलेस्टाईन नागरिक जखमी झाले. त्यामध्ये 13 वर्षांच्या एका मुलाचाही समावेश आहे. इस्रायली लढा विमानांनी हमासच्या शस्त्रगार आणि शस्त्रास्त्रे निर्मिती करणाऱ्या चार ठिकाणांवर बॉम्बफेक केली, असे इस्रायलच्या लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.





