महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊले उचलणार; राहुल गांधी यांची ग्वाही

नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात सत्तेवर आल्यानंतर महाविकास आघाडी शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊले उचलेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून राहुल यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना साद घातली.
सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल 7 हजार रूपयांची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) निश्चित केली जाईल. त्याशिवाय, बोनसही दिला जाईल. कांद्यासाठी योग्य दर निश्चित करण्याच्या उद्देशातून समिती स्थापन करण्यात येईल. कापसासाठीही योग्य दराची निश्चित होईल, असे त्यांनी म्हटले. भाजप मागील 3 निवडणुकांपासून सोयाबीनसाठी ६ हजार रूपयांच्या एमएसपीचे आश्वासन देत आहे. पण, घाम गाळून सोयाबीनचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना आजही ३ ते ४ हजार रूपयांचाच दर मिळत आहे.
महाविकास आघाडी अन्नदात्याला (शेतकरी) हक्क, मेहनतीचे फळ आणि न्याय मिळवून देईल, अशी हमी त्यांनी दिली. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील प्रचारावेळी राहुल यांनी सरकारची धोरणे शेतकरीविरोधी असल्याचे टीकास्त्र सोडले होते. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या.





