जिल्हा परिषदेचा ऐतिहासिक निर्णय! ग्रामीण भागातील ३५ हजार मुलींना मिळणार गर्भाशयाच्या कर्करोगाची मोफत लस!

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेने एक महत्त्वाकांक्षी आरोग्य उपक्रम हाती घेतला आहे. ‘कर्करोगमुक्त पुणे’ या ध्येयाअंतर्गत ग्रामीण भागातील ९ ते १४ वयोगटातील सुमारे ३५ हजार मुलींना मोफत ‘एचपीव्ही’ प्रतिबंधक लस दिली जाणार आहे.
या सर्वसमावेशक आरोग्य उपक्रमासाठी पुणे जिल्हा परिषदेने ‘जीविका फाउंडेशन’ या संस्थेसोबत “सर्व्हायकल मुक्त पुणे” या उपक्रमासाठी सामंजस्य करार केला आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि जीविका फाउंडेशनचे संचालक जिग्नेश पटेल यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना गजानन पाटील म्हणाले, हा उपक्रम प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या ९ ते १४ वयोगटातील मुलींवर लक्ष केंद्रित करेल. या वयोगटातील अंदाजे ३५ हजार मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या एचपीव्ही विषाणूविरुद्ध संरक्षणासाठी लसीचे दोन डोस मोफत दिले जाणार आहेत.
मार्च २०२६ पर्यंत जिल्ह्यातील या वयोगटातील सर्व पात्र मुलींना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही कर्करोग प्रतिबंधक लस पूर्णपणे ऐच्छिक असणार असून, लसीकरणापूर्वी संबंधित मुलींच्या पालकांची लेखी संमती घेणे बंधनकारक असेल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
लसीकरणासोबतच कर्करोग तपासणी मोहीम..
केवळ किशोरवयीन मुलींच्या लसीकरणापुरता हा उपक्रम मर्यादित नाही. या कराराच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व अविवाहित महिलांची तोंड, स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची मोफत तपासणीदेखील केली जाणार आहे. कर्करोगाचे निदान जितक्या लवकर होईल, तितके त्यावर योग्य वेळी उपचार करणे सोपे जाते. त्यामुळे या तपासणी मोहिमेमुळे आजाराचे लवकर निदान होऊन अनेकांचे प्राण वाचवणे शक्य होणार आहे.
या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर गजानन पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य आणि कर्करोग प्रतिबंधाच्या दृष्टीने हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या उपक्रमाचा किशोरवयीन मुली आणि महिलांना निश्चितच फायदा होईल. पुणे जिल्हा या माध्यमातून कर्करोगमुक्त आणि आरोग्यदायी भविष्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल करेल. लवकरच या उपक्रमाला सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.





