Hingoli : हिंगोलीकरांची झोप उडाली! दोन तासांत चार भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Hingoli : चार भूकंपाच्या धक्क्यांमध्ये गुरुवारी पहाटे ३ वाजून २३ मिनिटांनी बसलेला धक्का सर्वाधिक तीव्र धक्का होता.

Hingoli : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, पूरस्थिती आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे नागरिक आधीच चिंतेत असताना आता हिंगोली जिल्ह्यातून एक खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे.
बुधवारी रात्रीपासून गुरुवारी पहाटेपर्यंत अवघ्या दोन तासांच्या कालावधीत चार वेळा भूकंपाचे धक्के जाणवल्याने हिंगोली जिल्हा हादरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चार भूकंपाच्या धक्क्यांमध्ये गुरुवारी पहाटे ३ वाजून २३ मिनिटांनी बसलेला धक्का सर्वाधिक तीव्र धक्का होता. या भूकंपाची तीव्रता ४.१ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली असून भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील काकड दाभा गावाच्या शिवारात जमिनीखाली सुमारे १० किलोमीटर खोलीवर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
हिंगोली जिल्ह्यात यापूर्वीही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मात्र, इतक्या कमी वेळात सलग चार धक्के बसण्याची ही पहिलीच घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने येथील अनेकांनी रात्री घराबाहेरच आश्रय घेतला.
भूकंपामुळे काही ठिकाणी घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कोथळजगाव येथे एका घराच्या बांधकामाचा काही भाग कोसळला, तर पांगरा शिंदे गावातील मातीच्या घरांना तडे गेल्याचे आणि काही भिंतींचे भाग कोसळल्याचे वृत्त आहे. नुकसानग्रस्त भागांचा प्रशासनाकडून आढावा घेण्यात येत आहे. हिंगोलीसह नांदेड, यवतमाळ आणि परभणी जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.
सोशल मीडियावर अफवा
भूकंपानंतर सोशल मीडियावर विविध प्रकारच्या पोस्ट आणि अफवा मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीती वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच घाबरून न जाता सतर्क राहण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.
भूकंपाच्या धक्क्यांची वेळ
- पहिला धक्का बुधवारी मध्यरात्रीनंतर १ वाजून ३७ मिनिटांनी बसला. सिर्ली आणि पाग्रा शिंदे गाव परिसरात नागरिकांना हा हादरा जाणवला.
- यानंतर पहाटे २ वाजून १५ मिनिटांनी दुसरा धक्का बसला. या वेळी काकड दाभा गाव परिसर हादरला.
- अवघ्या दोन मिनिटांनंतर, म्हणजेच पहाटे २ वाजून १७ मिनिटांनी तिसरा भूकंपाचा धक्का जाणवला. याच काकड दाभा परिसरात पुन्हा एकदा जमीन हादरल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.
- त्यानंतर पहाटे ३ वाजून २३ मिनिटांनी सर्वाधिक तीव्र भूकंपाची नोंद झाली. काकड दाभा परिसरात ४.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का बसल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.
हेही वाचा : Mulshi Heavy Rain: मुळशी धरण परिसरात धुवाधार पाऊस! ताम्हिणी, बारपे, वळणे येथे दरडी कोसळल्या; जनजीवन विस्कळीत





