Hingoli News : किरकोळ वादातून पत्नीकडून पतीचा खून; हिंगोलीमधील धक्कादायक घटना

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील बाभूळगाव येथे पत्नीने पतीचा खून केल्याची घटना मंगळवारी ता. 3 पोलिसांनी मृतदेहाची तपासणी केल्यानंतर डोक्यातील जखमेवरून उघड झाली आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात मयताच्या पत्नी विरुध्द रात्री उशिरा खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील बाभूळगाव येथील कैलास गलंडे हे त्यांची पत्नी सुमित्रा गलंडे व दोन मुलांसह राहतात. त्यांचा एक मुलगा ट्रॅक्टर चालक म्हणून काम करतो. सोमवारी रात्रीच्या वेळी कैलास यांचा त्यांची सुमित्रा यांच्यासोबत वाद झाला होता. किरकोळ कुरबुरी नंतर आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास वाद विकोपाला गेला. या वादात कैलास हे कत्ती घेऊन सुमीत्राच्या अंगावर गेले. मात्र यावेळी सुमित्रा हिने पती कैलास यांच्या त्यांच्या डोक्यात कत्ती मारली. कत्तीचा घाव वर्मी लागल्यामुळे कैलास यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, आपल्या हातून पतीचा खून झाल्याचे लक्षात येताच सुमित्रा घाबरली. तिने दुचाकी वाहनातील पेट्रोल काढून कैलास यांच्या अंगावर ओतून पेटवून दिले. त्यानंतर त्यांनी दारुच्या नशेत पेटवून घेतल्याचा बनाव केला. अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, उपाधिक्षक आंबादास भुसारे, गोरेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद झळके, उपनिरीक्षक नितेश लेनगुळे, जमादार अनिल भारती, राहूल मैंदकर, विठ्ठल नवले यांच्यासह पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोरेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला.
यावेळी पोलिसांनी मृतदेहाची तपासणी केला असता मयत कैलास यांच्या डोक्यात मारहाणीच्या जखमा दिसून आल्या. पोलिसांनी या संदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी शस्त्राने वार केला असावा असे सांगितले. त्यावरून पोलिसांनी मयत कैलास यांच्या पत्नीनेच खून केल्याची शक्यता गृहीत धरून चौकशी सुरु केली. यामध्ये रात्री उशिरा मयत कैलास यांचा मुलगा गणेश गलंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिस ठाण्यात सुमित्रा गलंडे हिच्या विरुध्द खूनाचा गुन्हा दाखल झाल्याचे गोरेगाव पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी तिचा शोध सुरु केला असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. झाला आहे. पोलिस निरीक्षक झळके पुढील तपास करीत आहेत.





