Hingoli : वर्ग आठ, शिक्षक फक्त तीन! ‘आम्ही कसे शिकायचे?’; हिवरखेडा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा सवाल
Hingoli : हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा जिल्हा परिषद शाळेत ८ वर्गांसाठी केवळ ३ शिक्षक आहेत. शिक्षक नियुक्तीसाठी ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Hingoli : सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग असून, विद्यार्थ्यांची संख्या ८१ आहे. मात्र, या आठ वर्गांसाठी केवळ तीन शिक्षक कार्यरत आहेत. त्यात मुख्याध्यापकांना एसआयआरचे काम देण्यात आल्याने प्रत्यक्ष अध्यापनाची जबाबदारी दोन शिक्षकांवर आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे.
शाळेतील शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने विद्यार्थ्यांवरही त्याचा परिणाम होत आहे. आपल्या पाल्याच्या शिक्षणाचे काय होणार, अशी चिंता पालकांकडून व्यक्त होत आहे. काही पालकांनी आपल्या मुलांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र घेऊन त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी दाखल केले आहे. मात्र, अनेक विद्यार्थी अद्याप जिल्हा परिषद शाळेतच शिक्षण घेत आहेत.
शाळेत शिक्षकांची संख्या वाढवावी, यासाठी ग्रामस्थ आणि शालेय समितीच्या वतीने शिक्षण विभागाकडे वेळोवेळी मागणी करण्यात आली आहे. २९ सप्टेंबर २०२६ रोजी सेनगाव येथे गटशिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन नवीन शिक्षक देण्याची मागणी करण्यात आली.
‘आठ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा सीईओंच्या दालनासमोर शाळा भरवू’
हिवरखेडा गावाची लोकसंख्या सुमारे १,५०० आहे. या शाळेत शिक्षण घेतलेले योगेश निरगुडे पुढे जिल्हाधिकारी झाले. त्यांनी शाळेसाठी डिजिटल वर्गखोली उपलब्ध करून दिली आहे. तसेच लोकवर्गणीतून शाळेत दोन डिजिटल वर्गखोल्या तयार करण्यात आल्या आहेत.
चार वर्षांपूर्वी शिक्षकांनी प्रत्येकी पाच हजार रुपये आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने सुमारे दीड लाख रुपये खर्च करून शाळेची रंगरंगोटी केली. शाळेच्या भिंतींवर शैक्षणिक माहिती देऊन त्या बोलक्या करण्यात आल्या आहेत. मात्र, शिक्षकांची कमतरता असल्याने या सुविधांचा विद्यार्थ्यांना अपेक्षित फायदा मिळत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
शिक्षण विभागाने आठ दिवसांत शिक्षकांची नियुक्ती करण्याबाबत निर्णय घ्यावा. अन्यथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीईओ) दालनासमोर शाळा भरवून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शालेय समितीने दिला आहे.
मागील वर्षीही आंदोलन
शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने मागील वर्षीही सीईओंच्या दालनात शाळा भरविण्याचे आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक देण्यात आला होता. मात्र, आता कायमस्वरूपी शिक्षकाची आवश्यकता असल्याचे शालेय समितीचे म्हणणे आहे.
“हिवरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत आठवीपर्यंत वर्ग आहेत. मात्र, केवळ तीन शिक्षक कार्यरत आहेत. एका शिक्षकाचे पद रिक्त असून, अद्याप त्या जागेवर नियुक्ती झालेली नाही. गेल्या वर्षी आंदोलनानंतर तात्पुरता शिक्षक देण्यात आला होता. आता कायमस्वरूपी शिक्षक द्यावा. याबाबत २९ सप्टेंबर रोजी गटशिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. आठ दिवसांत शिक्षण विभागाने दखल घेतली नाही, तर सीईओंच्या दालनासमोर आंदोलन करण्यात येईल.” – शिवशंकर निरगुडे, शालेय समिती अध्यक्ष, हिवरखेडा





