नवी दिल्ली : टेलिव्हिजन होस्ट आणि चित्रपट निर्मितीमध्ये तिच्या भूमिकांसाठी ओळखली जाणारी प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान सध्या अडचणीत आहे. सध्या फराह मास्टशेफ हा शो होस्ट करत आहे. शो दरम्यान तिने केलेल्या टिप्पण्यांमुळे लोक तिचा निषेध करत आहेत. छपरी लोकांचा सण म्हणजे होळी असतो, असे विधान केल्याने आता फराह खानवर टीका होत आहे. या प्रकरणात, विकास फाटक उर्फ हिंदुस्तानी भाऊ यांनी तिच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल केली आहे, ज्यामध्ये फराहवर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी २१ फेब्रुवारी रोजी मुंबईतील खार पोलिस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली. हे प्रकरण वकील अली काशिफ खान देशमुख यांच्याकडे आहे. वृत्तानुसार, हिंदुस्थानी भाऊ यांचे वकील अली काशिफ खान देशमुख म्हणाले, माझ्या अशिलाचा असा विश्वास आहे की, फराह खानच्या टिप्पण्या केवळ अपमानास्पद नव्हत्या तर त्याने धार्मिक भावना दुखावल्या. पवित्र सणाचे वर्णन करण्यासाठी छपरी हा शब्द वापरणे अत्यंत अनुचित आहे. संपूर्ण प्रकरण काय आहे? गेल्या गुरुवारपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये फराह खान म्हणते की होळी हा सर्व छपरी लोकांचा आवडता सण आहे. या टिप्पणीबाबत त्यांनी केलेल्या विधानाचा लोक निषेध करत आहेत.