Oscar 2025 : हिंदी भाषिक ‘अनुजा’ शॅार्ट फिल्म अॅास्करच्या यादीत दाखल

97 व्या अकादमी अर्थात अॅास्कर पुरस्कारांसाठीच्या 24 श्रेणींसाठी नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. चित्रपटांबरोबरच शॅार्ट फिल्मचाही समावेश आहे. दिग्दर्शक ॲडम जे ग्रेव्हज यांनी हिंदी भाषेत बनवलेल्या ‘अनुजा’ या अमेरिकन चित्रपटाला ऑस्कर 2025 साठी नामांकन मिळाले आहे. या चित्रपटाला लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म श्रेणीत नामांकन मिळाले आहे. या चित्रपटाची कार्यकारी निर्माती अभिनेत्री प्रियांका चोप्रा आहे.
ग्रेव्हज निर्मित ‘अनुजा’ हा लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म आहे. या शॅार्ट फिल्मची कथा अनुजा नावाच्या 9 वर्षांच्या मुलीची आहे, ती तिच्या मोठ्या बहिणी आणि आई वडिलांसह एका कपड्याच्या कारखान्यात काम करते. या शॅार्ट फिल्ममध्ये 9 वर्षांच्या अनुजाचा प्रवास दाखवण्यात आला आहे. अनुजा’ ही शॅार्ट फिल्म वेगवेगळ्या लोकांनी एकत्रित बनवलेली शॅार्ट फिल्म आहे. ही शॅार्ट फिल्म भारतीय नॉन-प्रॉफिट एनजीओ, सलाम बालक ट्रस्ट, ना-नफा निर्मिती कंपनी, शाईन ग्लोबल या बॅनरखाली बनविण्यात आली आहे.
सलाम बालक ट्रस्टची सुरुवात प्रसिद्ध दिग्दर्शक मीरा नायर यांच्या कुटुंबाने केली होती. हे एनजीओ दिल्ली येथील एनसीआरच्या रस्त्यावर राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या मुलांना आधार देते. ऑक्टोबर 2024 मध्ये निर्माता गुनीत मोंगा हे या शॅार्ट फिल्मसाठी कार्यकारी निर्माता म्हणून जोडले गेले. यानंतर अभिनेत्री मिंडी केलिंग नोव्हेंबर 2024 मध्ये आणि प्रियांका चोप्रा (जोनास) जानेवारी 2025 मध्ये या शॅार्ट फिल्मची कार्यकारी निर्माती म्हणून सहभागी झाली आहे.
‘अनुजा’ची पुरस्कारांवर मोहर
8 जून 2024 रोजी 24 व्या डेडसेंटर फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘अनुजा’ चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर पार पडला. ऑगस्ट 2024 मध्ये होलीशॉर्ट्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये चित्रपटाने सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट पुरस्कार जिंकला. ऑक्टोबर 2024 मध्ये मॉन्टक्लेअर फिल्म फेस्टिव्हलमध्ये शॉर्ट फिल्मसाठी प्रेक्षक पुरस्कार जिंकला. ऑक्टोबर 2024 मध्ये न्यूयॉर्क शॉर्ट्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ग्रँड प्राईजही जिंकले.
या दोन चित्रपटांना नामांकन नाही
3 मार्च रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर ऑस्कर 2025 थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. दिग्दर्शक संध्या सुरीचा ‘संतोष’ आणि दिग्दर्शिका पायल कपाडियाचा यांचा ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटांची ऑस्कर 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीसाठी नामांकित होण्याची अपेक्षा होती. मात्र, या दोन्ही चित्रपटांना नामांकन मिळू शकलेले नाही.




