NCP Politics : अखेर राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम; शरद पवारांनी 3 शब्दांतच विषय संपवला

पुणे | गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये संभाव्य एकत्रीकरणाबाबत चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अनेकदा एकाच मंचावर दिसल्याने या चर्चा अधिकच गडद होत होत्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात शरद पवार यांचे खुलेपणाने कौतुक केल्याने महायुतीत पवारांना घेण्याचा संकेत मिळतोय का? अशी चर्चा देखील रंगली. मात्र, या चर्चांवर आज खुद्द शरद पवार यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली असून, आपल्या नेहमीच्या थेट शैलीत त्यांनी अवघ्या तीन शब्दांतच हा विषय संपवला “मला माहिती नाही…”, असं म्हणत शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला पूर्ण विराम दिला आहे.
यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केलं की, “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार” या केवळ हवेतल्या चर्चा आहेत. “शरद पवार शाहू-फुले-आंबेडकर यांचा विचार मानणारे नेते आहेत. अशा धर्मांध आणि जातीय शक्तींशी ते कधीही जाऊ शकत नाहीत,” असंही राऊतांनी ठामपणे नमूद केलं.
या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे “मला माहिती नाही…” हे उत्तर अनेक अर्थांनी घेतलं जात आहे. राजकीय शांतता राखण्यासाठी दिलेले उत्तर की रणनीतीचा भाग? मात्र, एका गोष्टीची खात्री आहे. राज्यातील राष्ट्रवादीचे राजकारण सध्या अनिश्चिततेच्या वळणावर आहे आणि शरद पवारांचा पुढील निर्णयच या चर्चांना अंतिम दिशा देईल.





