मुंबई – मराठी भाषेवरून राजकिय पक्षांमध्ये सतत्याने एकमेकांवर कुरघोडी सुरूच असते. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापुर्वी अनेकदा मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमीका घेतली आहे. केंद्र सरकारच्या तीन भाषीय धोरणाला देखील राज ठाकरेंनी कडाडून विरोध केला होता. मात्र, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनी कोणाचेही नाव न घेता पुन्हा एकदा राज ठाकरेंवर टीका केली. राजकीय कारणांसाठी काहीजण मराठी आणि बिगरमराठींमध्ये तेढ निर्माण करू इच्छितात. हिंदी माझी आई आणि मराठी माझी मावशी आहे, असे म्हणत त्यांनी परत एकदा राज ठाकरेंना चिमटा काढला. बृहन्मुंबई महानगरपालिकेत सत्ता काबीज करण्यासाठी सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी त्यांच्या धोरणात्मक तयारी तीव्र केल्या आहेत. या अनुषंगाने, भाजपने उत्तर भारतीय समुदायाला लक्ष्य करून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम उत्तर भारतीय संघाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उत्तर भारतीय समुदायाने मराठी आणि बिगरमराठी लोकांमध्ये सुसंवाद आणि एकतेचा संदेश दिला. या कार्यक्रमाची सुरुवात मराठी भाषेतील भाषणाने झाली. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनी हिंदी माझी आई आणि मराठी माझी मावशी असल्याचे सांगितले. कृपाशंकर सिंह म्हणाले की, काही लोक निवडणुका येताच मराठी आणि बिगरमराठींमध्ये तेढ निर्माण करू इच्छितात. जेव्हा त्यांना त्यांचे राजकीय अस्तित्त्व धोक्यात असल्याचे दिसते, तेव्हाच ते भाषेचा आधार घेतात. कृपाशंकर सिंह यांनी महाराष्ट्राच्या विकासात उत्तर भारतीय समुदाय समान भागीदार असल्याचे वक्तव्य केले आणि सांगितले की हा समुदाय केवळ कामगार नाही तर राज्याच्या विकासात योगदान देणारा एक समर्पित नागरिक आहे. बीएमसी निवडणुकीपूर्वी मराठी विरुद्ध बिगरमराठी भाषा वादाच्या पार्श्वभूमीवर राजकीय दृष्टिकोनातूनही ही घटना एक महत्त्वाचा संकेत मानली जात आहे. भाजपचा हा सौहार्दाचा संदेश केवळ मतदारांशी जोडण्याचा प्रयत्न नाही तर मुंबईच्या विविधतेला एकतेत रूपांतरित करण्याच्या त्यांच्या धोरणाचा एक भाग आहे.