Himmat Kick Runout : क्रिकेट की फुटबॉल? रागाच्या भरात चेंडूला लाथ मारली अन् सामना थेट सुपर ओव्हरमध्ये; पाहा रनआऊटचा VIDEO
Himmat Kick Runout : सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर न्यू दिल्ली टायगर्सचा कर्णधार हिमत सिंह याने संतापाच्या भरात चेंडूला मारलेली लाथ त्याच्याच संघासाठी वरदान ठरली.

Himmat Singh Kick Ball Run Out DPL 2026 Super Over Match : दिल्ली प्रीमियर लीग २०२६ (DPL 2026) स्पर्धेत मंगळवारी झालेल्या न्यू दिल्ली टायगर्स विरुद्ध आऊटर दिल्ली वॉरियर्स सामन्यात क्रिकेट इतिहासातील एक सर्वात अजब आणि नाट्यमय प्रसंग पाहायला मिळाला. सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर न्यू दिल्ली टायगर्सचा कर्णधार हिमत सिंह (Himmat Singh) याने संतापाच्या भरात चेंडूला मारलेली लाथ त्याच्याच संघासाठी वरदान ठरली. या अजब रनआऊटमुळे सामना थेट सुपर ओव्हरमध्ये (Super Over) गेला असून या थराराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अखेरच्या चेंडूवर नेमकं काय घडलं?
पावसामुळे हा सामना प्रत्येकी १५-१५ षटकांचा करण्यात आला होता. आऊटर दिल्ली वॉरियर्सला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर फक्त एका धावेची गरज होती. फलंदाजाने चेंडू मिडऑफच्या दिशेने मारला आणि धाव घेण्यासाठी धाव घेतली. न्यू दिल्लीचा कर्णधार हिमत सिंह वेगाने चेंडूपाशी पोहोचला, परंतु सोपा रनआऊट करण्याची संधी त्याच्या हातून निसटली. यामुळे निराश आणि संतप्त झालेल्या हिमतने रागाच्या भरात चेंडूला जोरात लाथ मारली. आश्चर्य म्हणजे, त्याने लाथ मारलेला चेंडू थेट नॉन-स्ट्रायकर एंडच्या स्टंप्सवर जाऊन आदळला. फलंदाज प्रथम सलूजा क्रीजच्या बाहेर असल्याने त्याला धावबाद घोषित करण्यात आले आणि सामना बरोबरीत सुटला.
𝑭𝒆𝒆𝒕 𝑫𝒐𝒏’𝒕 𝑭𝒂𝒊𝒍 𝑴𝒆 𝑵𝒐𝒘 🎵 😉
Catch all the DPL 2026 action LIVE on FanCode 📲#DelhiPremierLeague pic.twitter.com/R9J59uyuc9
— FanCode (@FanCode) August 4, 2026
क्षणात बदलल्या भावना; आयपीएलमध्ये एलएसजीचा भाग!
सुरुवातीला हुकलेल्या संधीमुळे डोक्यावर हात मारणारे न्यू दिल्लीचे खेळाडू चेंडू स्टंप्सवर लागताच जल्लोष करू लागले. हिमत सिंहचाही चेहरा क्षणात बदलला. परंतु, सुपर ओव्हरमध्ये आऊटर दिल्ली वॉरियर्सने संयम राखत अखेर विजय मिळवला, पण हिमतच्या या ‘किक’ची चर्चा थांबलेली नाही.
हेही वाचा – Mohammed Shami : मोहम्मद शमीच्या ‘त्या’ वक्तव्याने क्रीडा विश्वात खळबळ ! म्हणाला…
२९ वर्षीय हिमत सिंह आयपीएल २०२५ मध्ये मिचेल मार्शचा बदली खेळाडू म्हणून लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघाच्या ताफ्यात सामील झाला होता. आयपीएल २०२६ च्या हंगामात त्याने ६ सामन्यांत ९२ धावा केल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत चमकदार कामगिरी करणाऱ्या हिमतच्या या विचित्र रनआऊटने दिल्ली प्रीमियर लीगचा थरार वाढवला आहे.





