शिमला – हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी मुख्यमंत्री सुखाश्रय सहायता कोष योजनेची स्थापन केली असून त्यासाठी 101 कोटी रुपये निधी दिला जाणार आहे. सीएम सखू म्हणाले की, “आमचे सरकार स्थापन होऊन 21 दिवस झाले आहेत आणि 21 दिवसांत सरकारने समाजाप्रती जागरुकता दाखवली आहे. पहिल्याच बैठकीत आधार नसलेल्या मुलांसाठी योजना आणण्याचा निर्णय घेतला आहे.” ही योजना आजपासून लागू होणार असून, त्यामुळे मुलांच्या शिक्षण आणि इतर गरजा पूर्ण होण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू म्हणाले की, या योजनेसाठी निधी देण्यासाठी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी पहिला पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच त्यांनी भाजपच्या सर्व आमदारांनाही या योजनेत योगदान देण्याची विनंती केली आहे. हिमाचलमध्ये सुमारे 6 हजार मुले अनाथाश्रमात राहतात, ज्यांना राज्य सरकार 12 वी पर्यंत आश्रय देते. आजपासून लागू होणारा हा निधी अशा मुलांसाठी वापरला जाणार आहे, ज्यांना पुढील शिक्षण सुरू ठेवायचे आहे. जेणेकरून त्यांच्या मनात निराशा निर्माण होणार नाही. मेडिकल कॉलेज, पॅरा मेडिकल किंवा इतर कोणत्याही संस्थेत कोर्स करू इच्छिणाऱ्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च आम्ही उचलू, असे सुखू यांनी म्हंटले आहे.