Himachal Pradesh Assembly Election 2022 : भाजपची 62 उमेदवारांची यादी जाहीर

नवी दिल्ली – भाजपने आज हिमाचल प्रदेशातील विधानसभेच्या एकूण 68 जागांपैकी 62 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना त्यांच्या मतदारसंघातून सेराजमधून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
माजी केंद्रीय मंत्री सुखराम यांचा मुलगा अनिल शर्मा यांना मंडीतून उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीत पाच महिलांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या सोमवारच्या बैठकीत ही यादी निश्चित करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व अन्य वरिष्ठ या बैठकीला उपस्थित होते. काही विद्यमान आमदारांना या उमेदवारीतून डावलण्यात आले आहे. राज्यात विधानसभेच्या निवडणुका 12 नोव्हेंबरला होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर आहे.
दरम्यान, हिमाचल प्रदेशासाठी जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार तेथे एकाच टप्प्यात 12 नोव्हेंबरला मतदान होणार असून त्यासाठी 17 ऑक्टोबरला अधिसूचना जारी होईल आणि 25 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील.27 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जाची छाननी केली जाणार असून 29 ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेता येणार आहेत. 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्य विधानसभेत एकूण 68 जागा असून बहुमतासाठी 35 जागा आवश्यक आहेत.





