प्रभात वृत्तसेवा पुणे- खडकवासला धरणातून हंगामातील सर्वाधिक म्हणजे २८ हजार ६६२ क्यूसेक पाणी मुठा नदीत सोडल्यानंतरही शहराच्या कोणत्याही भागात पूरस्थिती उद्भवलेली नाही. पालिकेने पावसाळ्यापूर्वी एकतानगरी परिसरात नदीकाठचा काढलेला राडारोडा, अतिक्रमणे, तसेच नदीपात्रातील अडथळे दूर केल्याने यावर्षी पाणी घुसण्याचे प्रकार घडले नाहीत. पाटबंधारे विभागानेही दोन दिवसांपासून पावसाच्या अंदाजानुसार नियंत्रित विसर्ग केला आहे. गेल्या वर्षी पावसाचा अंदाज आल्यावर २५ जुलै रोजी धरणातून अचानकपणे मोठ्या प्रमाणात पाणी सोडले होते. त्यामुळे एकतानगरीसह पाटील इस्टेट, रजपूत झोपडपट्टी, पुलाची वाडी परिसरात पूरस्थिती उद्भवली होती. त्या वेळी ही स्थिती निर्माण होण्यामागे पाटबंधारे विभाग आणि पालिकेत असलेल्या समन्वयाचा अभाव हे कारण होते. यावर्षी दोन्ही विभागांत समन्वय असल्याने ही स्थिती टाळता आली. दोन दिवसांपासून तयारी खडकवासला, पानशेत धरणांमध्ये शनिवारीच ९० टक्के पाणीसाठा होता. त्यातच पुढील दोन दिवसांसाठी हवामान विभागाने रेड अर्लट दिला होता. घाटमाथ्यावर होणाऱ्या पावसाचा अंदाज लक्षात घेऊन अगोदरच खडकवासला धरण ५० टक्के रिकामे ठेवले होते. शनिवारी वरसगाव धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आणि रविवारी पानशेत धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या दोन्ही धरणांचे पाणी खडकवासला धरणात आल्याने तेथून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आला. सोमवारी दुपारी २५ हजार ६९६ क्युसेक केलेला विसर्ग करण्यात आला. त्यानंतर रात्री सात वाजता हा विसर्ग २८ हजार ६६२ क्युसेक करण्यात आला. सीसीटीव्हीची नजर पूरस्थिती टाळण्यासाठी पालिकेने गेल्या दोन दिवसांपासून मदत पथके तैनात केली होती. नागरिकांना सूचना देण्यासाठी यंत्रणा उभारली. शिवाय नदीच्या पाणीपातळीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कार्यरत होते. रात्रीच्या वेळी महावितरणचा वीजपुरवठा खंडित झाल्यास जनरेटर, हॅलोजन, तसेच नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी अग्निशमनदल, क्षेत्रीय कार्यालयाची पथके तैनात केली होती. नागरिकांना स्थलांतर केले, तर त्यांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्थाही केली होती. धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्यानंतर पालिकेचे परिमंडळ उपायुक्त विजय थोरात, पालिका सहय्यक आयुक्त प्रज्ञा पोतदार यांच्यासह क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यानंतर पालिका आयुक्तांना व्हिडिओद्वारे केलेल्या नियोजनाची माहिती देण्यात आली.