नवी दिल्ली – केंद्र सरकारने गेल्या वर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पात प्रत्यक्ष करातून जेवढी रक्कम अपेक्षित धरली होती त्यापेक्षा जास्त कर जमा झाला आहे. असा प्रकार तीन वर्षानंतर पहिल्यांदाच घडला आहे. प्रत्यक्ष करांमध्ये कंपनी कर आणि प्राप्ती कराचा समावेश असतो. सुरुवातीला प्रत्यक्ष करातून 11.08 लाख कोटी रुपये जमा होतील असे गृहीत धरले होते. मात्र आता प्रत्यक्षात 12.50 लाख कोटी रुपये जमा होणार आहेत. असा प्रकार 2017-18 मध्ये घडला होता. सरलेल्या वर्षातील कर संकलन जास्त झाल्यामुळे आता आगामी वर्षामध्ये प्रत्यक्ष करातून 14.20 लाख कोटी रुपये जमा होतील असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. यामध्ये 7.20 लाख कोटी रुपये कंपनी कर असेल तर 7 लाख कोटी रुपये प्राप्तिकरातून अपेक्षित आहेत.