शिर्डीत हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 15 पीडित मुलींची सुटका

शिर्डी – पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून शिर्डी येथील तब्बल सहा बड्या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. हॉटेलमधून 15 पिडित मुलींची सुटका करण्यात आली असून, 11 जणांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने शुक्रवार (दि.5) रोजी रात्री केली. शिर्डी शहर व परिसरातील हॉटेल एक्झिक्युटिव्ह इन, हॉटेल साई कीर्ती पॅलेस, हॉटेल एस. पी., हॉटेल साई शितल, हॉटेल गणेश पॅलेस, हॉटेल साई महाराजा अशा सहा ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती. या माहितीच्या अधारे पोलिसांच्या पथकाने शिर्डी येथे जावून सहा हॉटेलमध्ये छापे टाकत 15 पिडित मुलींची सुटका केली.
याप्रकरणी 11 आरोपींना अटक करण्यात आली असून, आरोपीविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, शिवाजी डोईफोडे, मेघश्याम डांगे आदींच्या पथकाने केली.





