“ब्रिक्स’ परिषदेसाठी जाणार दक्षिण आफ्रिकेला
आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाचे अटक वॉरंट असतानाही दौरा
नेत्यांकडून होत आहे अटकेचा आग्रह
केप टाऊन, (दक्षिण आफ्रिका) : रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि रशियाच्या अन्य उच्चस्तरिय अधिकाऱ्यांना दक्षिण आप्रिकेने राजनैतिक संरक्षण प्रदान केले आहे. पुतीन आणि अन्य वरिष्ठ अधिकारी “ब्रिक्स’ परिषदेच्या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेमध्ये जाणार आहेत. या परिषदेच्या निमित्ताने आयोजित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांनाही ते उपस्थित राहणार आहेत.
संयुक्त राष्ट्राच्या ठरावानुसार पुतीन आणि अन्य नेत्यांना अटकेपासून आणि ताब्यात घेतले जाण्यापासूनचे संरक्षण देण्यात आले आहे, असे दक्षिण आफ्रिकेचे आंतरराष्ट्रीय संबंध आणि सहकार्य खात्याचे मंत्री नोलेदी पांदोर यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. याबाबतचे गॅझेट 19 मे रोजी काढण्यात आले आणि सोमवारी ते प्रसिद्धीस देण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांसाठी दक्षिण आफ्रिकेत येणाऱ्या उच्चस्तरिय पाहुण्यांना राजनैतिक संरक्षण देणे ही नित्याची बाब असून अशी नोटीस नेहमीच प्रसिद्ध केली जात असते, असे पांदोर यांच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
पुतीन यांच्याविरोधात नेदरलॅन्डमधील द हेगमधील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने मार्च महिन्यात अटक वॉरंट बजावले आहे. दक्षिण आफ्रिका हा या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाचा सदस्य देश आहे. त्यामुळे पुतीन दक्षिण आफ्रिकेत आल्यास त्यांना अटक केली जाणे क्रमप्राप्त आहे. म्हणून त्यांना राजनैतिक संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाच्या अटक वॉरंटबाबत काय भूमिका घेता येईल, याबाबत दक्षिण आप्रिका सरकारकडून तज्ज्ञांचा सल्ला घेतला जात आहे.
पण तरिही दक्षिण आफ्रिका हा “ब्रिक्स’ गटाचाही सदस्य देश आहे. “ब्रिक्स’चे आयोजन तेथेच होत असल्याने दक्षिण आफ्रिकेकडे सध्याचे अध्यक्षपददेखील आहे. या परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेने पुतीन यांना ऑगस्ट महिन्यातच अधिकृत निमंत्रण पाठवले आहे. जर पुतीन यांनी दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर पाय ठेवला तर त्यांना त्वरित अटक करण्यात यावी, असा आग्रह दक्षिण आफ्रिकेतील विरोधी नेते धरत आहेत.