रांची : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना झारखंड उच्च न्यायालयाकडून बुधवारी मोठा दिलासा मिळाला आहे. ईडी समन्सची अवहेलना केल्याप्रकरणी रांचीच्या विशेष न्यायालयात वैयक्तिकरित्या हजर राहण्यापासून न्यायालयाने त्यांना सूट दिली आहे.
न्या. अनिल कुमार चौधरी यांच्या खंडपीठाने ईडीला नोटीस बजावली असून उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 डिसेंबरला निश्चित करण्यात आली आहे. विशेष न्यायालयाने 25 नोव्हेंबर रोजी वैयक्तिक हजेरीतून सूट देण्याची सोरेनची याचिका फेटाळून लावत त्यांना 4 डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते.
या आदेशाला हेमंत सोरेन यांनी झारखंड उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान त्यांचे वकील पीयूष चित्रेश, दीपंकर रॉय आणि श्रेय मिश्रा यांनी युक्तीवाद केला. यावेळी त्यांनी हेमंत सोरेन यांना वैयक्तिक उपस्थितीपासून सूट मिळावी, अशी विनंती न्यायालयाला केली.
दरम्यान, हेमंत सोरेन यांच्या विरोधात ईडीने 19 फेब्रुवारी 2024 रोजी सीजेएम न्यायालयात तक्रार दाखल केली होती. यामध्ये एजन्सीने हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी दहा समन्स पाठवण्यात आल्याचे सांगितले. मात्र, यापैकी केवळ दोन समन्सवर ते हजर राहिले होते.