Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा झटका ! पोटगीतील 50% रक्कम तातडीने जमा करण्याचे आदेश

Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. करुणा शर्मा यांना देय असलेल्या पोटगीच्या 50 टक्के रक्कम चार आठवड्यांत न्यायालयात जमा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. यासोबतच करुणा यांच्या मुलीच्या पोटगीची 100 टक्के रक्कमही तातडीने जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या निर्णयानंतर करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करताना त्यांच्या मागे असलेल्या “दलाल गँग”मुळे चुकीची पावलं उचलली जात असल्याचा दावा केला. “न्यायालयाने मला न्याय दिला, याबद्दल मी आभारी आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
कोर्टाचा काय आहे निर्णय?
वांद्रे कुटुंब न्यायालयाने करुणा शर्मा यांना दरमहा 1 लाख 25 हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी दिले होते. या निर्णयाविरोधात धनंजय मुंडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गुरुवारी न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या एकलपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.
न्यायालयाने मुंडे यांना फटकारताना ऑगस्ट 2022 ते जून 2025 या 35 महिन्यांच्या कालावधीसाठी एकूण 43 लाख 75 हजार रुपयांपैकी 50 टक्के रक्कम, म्हणजे 21 लाख 87 हजार 500 रुपये, पुढील चार आठवड्यांत वांद्रे न्यायालयात जमा करण्याचे निर्देश दिले. तसेच, करुणा यांच्या मुलीच्या पोटगीची संपूर्ण रक्कमही कोर्टात जमा करण्यास सांगितले. याचिकेवर अंतिम निर्णय आठ आठवड्यांनंतर दिला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
करुणा शर्मा यांचे गंभीर आरोप
करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करत सांगितले की, न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असतानाही त्यांना धनंजय मुंडे यांच्याकडून त्रास दिला जात आहे.
त्यांच्या लोकांकडून दररोज जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असून, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून अश्लील व्हिडिओ मोबाइलवर पाठवले जात असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला. “धनंजय मुंडे मूळात चांगले आहेत, पण त्यांच्या मागे असलेली दलाल गँग त्यांना चुकीच्या मार्गावर नेते,” असा आरोप करुणा यांनी केला. त्या पुढे म्हणाल्या, “माझे सर्व पैसे मिळेपर्यंत मी शांत बसणार नाही.”
पोटगी प्रकरणाचा पार्श्वभूमी
वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने करुणा शर्मा यांना पोटगीस पात्र ठरवत दरमहा 1 लाख 25 हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाला धनंजय मुंडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळताना पोटगीची रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली असून, धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
करुणा शर्मा यांचा निर्धार
न्यायालयाच्या निर्णयानंतर करुणा शर्मा यांनी ठाम भूमिका घेतली आहे. “न्यायालयाने मला आणि माझ्या मुलीला न्याय दिला. धनंजय मुंडे यांनी माझी आणि माझ्या मुलीची पोटगीची रक्कम तातडीने जमा करावी. माझे हक्क मिळेपर्यंत मी लढत राहीन,” असे त्या म्हणाल्या.
या प्रकरणाची पुढील सुनावणी आठ आठवड्यांनंतर होणार असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे प्रकरण धनंजय मुंडे यांच्यासाठी राजकीय आणि वैयक्तिक पातळीवर मोठी डोकेदुखी ठरत असून, येत्या काळात याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटण्याची शक्यता आहे.




