अभिनेता ऋतिक रोशनला ‘Personality Rights’ प्रकरणी हायकोर्टाचा मोठा दिलासा, स्पष्टच सांगितलं….

Hrithik Roshan – बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशन यांना दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांच्या ‘पर्सनॅलिटी राइट्स’ (व्यक्तिमत्त्व हक्क) संरक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार, न्यायालयाने सोशल मीडिया आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर ऋतिक रोशन यांच्या परवानगीशिवाय टाकण्यात आलेले पोस्ट्स आणि त्यांचे यूआरएल तातडीने हटविण्याचे निर्देश दिले आहेत.
हा निर्णय अभिनेता ऋतिक रोशन यांच्या प्रतिमा, ओळख आणि वैयक्तिक छबीचा अनधिकृत वापर थांबविण्यासाठी घेण्यात आला आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की, ‘अंतिम आदेश देण्यापूर्वी सर्व संबंधित पक्षांचे म्हणणे ऐकले जाईल, जेणेकरून न्याय प्रक्रिया पारदर्शक आणि न्याय्य राहील’.
ऑनलाइन प्लॅटफॉर्मना नोटिसा :
न्यायालयाने ऋतिक रोशन यांच्या वकिलांना त्यांच्या अधिकृत प्रोफाइल पानांचे तपशील सादर करण्यास सांगितले आहे, तसेच मूळ सबस्क्राइबरची माहिती मिळवण्याचे निर्देश दिले आहेत.
याचिकेच्या सुनावणीत ईबे, फ्लिपकार्ट आणि टेलिग्राम यांसारख्या मोठ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या बाजूनेही मते नोंदवली गेली. या कंपन्यांनी सांगितले की, काही पोस्ट्स व्यावसायिक हेतूसाठी वापरल्या जात आहेत, त्यामुळे त्यांचे यूआरएल हटविणे आवश्यक आहे.
ऋतिक रोशन यांची याचिका :
ऋतिक रोशन यांच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, त्यांच्या नावाचा, छायाचित्रांचा आणि ओळखीचा ऑनलाइन गैरवापर होत आहे. काही ठिकाणी त्यांच्या ओळखीसंबंधी भ्रामक आणि चुकीची माहिती प्रसारित केली जाते, ज्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्व हक्कांचे उल्लंघन होते.
याशिवाय, काही लोक त्यांच्या प्रतिमेचा वापर करून अनधिकृतरीत्या आर्थिक लाभ मिळवत आहेत. त्यामुळे त्यांनी न्यायालयाकडे मागणी केली की, त्यांच्या फोटो, व्हिडिओ किंवा नावाचा कोणत्याही प्लॅटफॉर्मवर परवानगीशिवाय वापर बंद करण्यात यावा.
ऋतिक रोशन यांच्याप्रमाणेच अनेक प्रसिद्ध व्यक्तींनीदेखील आपल्या व्यक्तिमत्त्व हक्कांच्या संरक्षणासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यात ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, करण जोहर आणि कुमार सानू यांसारख्या नामांकित व्यक्तींचा समावेश आहे. न्यायालयांनी या सर्वांना अंतरिम दिलासा देत त्यांच्या ओळखीचा अपमानजनक किंवा दिशाभूल करणाऱ्या स्वरूपात वापर होऊ नये असा आदेश दिला होता.
भारतामध्ये पर्सनॅलिटी राइट्ससाठी स्वतंत्र कायदा नाही :
भारतामध्ये अद्याप ‘पर्सनॅलिटी राइट्स’साठी स्वतंत्र कायदा नसला तरी, न्यायालये संविधानातील (कलम) अनुच्छेद 21 अंतर्गत दिलेल्या गोपनीयतेच्या अधिकाराच्या आधारे व्यक्तींचे संरक्षण करीत आहेत. हा अधिकार एखाद्या व्यक्तीची ओळख, प्रतिमा आणि आवाजाचा अनधिकृत वापर रोखतो.
न्यायालयाने दिलेल्या ताज्या आदेशानुसार, ई-कॉमर्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून ऋतिक रोशन यांच्याशी संबंधित अनधिकृत पोस्ट्स हटवाव्या लागतील, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.





