पुण्यात हाय अलर्ट घोषित: ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर दहशतवादी हल्ल्याचा धोका, हवाई उपकरणांच्या वापरावरही बंदी

Pune News : भारताने जम्मू काश्मिर येथील पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून पाकिस्तानातील दहशतवाद्यांना अॅापरेशन सिंदूर ही मोहिम राबवित लक्ष्य केले. या हल्ल्यात भारताने अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला. पाकिस्तानकडूनही ड्रोन हल्ले करण्यात आले होते.
त्यानंतर भारत पाकिस्तान या दोन्ही देशात तणाव निर्माण झाला होता. दोन्ही देशांतील लष्करी कारवाई थांबविण्यात आली असून शस्त्रसंधीचा निर्णय घेण्यात आला. मात्र, असे असले तरी पाकिस्तानकडून दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही, या पार्श्वभूमीवर पुणे शहरात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
भारतीय सैन्याच्या अॅापरेशन सिंदूरनंतर दहशतवादी संघटनांकडून संभाव्य हल्ल्याचा धोका लक्षात घेता पुणे पोलिसांनी सुरक्षा उपाययोजनांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी या संदर्भात आदेश जारी केले आहेत. त्यानुसार पुणे शहरात १२ जून २०२५ पर्यंत काही हवाई उपकरणांच्या वापरावर बंदी घातली आहे. यामध्ये ड्रोन, रिमोट कंट्रोल एअरक्राफ्ट, मायकोलाइट विमान, पॅराग्लायडर, पॅरामोटर, हॅण्डग्लायडर, हॉट एअर बलून इत्यादी उपकरणांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये धार्मिक स्थळे, पर्यटन केंद्र यांचा समावेश आहे. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबईतही पोलिस यंत्रणा संतर्क झाली असून पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबईतही पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. धार्मिक स्थळे, पर्यटन केंद्रे आणि सार्वजनिक ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली तर तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





