मिझोराममध्ये तब्बल ‘इतक्या’ कोटींचे हेरॉईन जप्त; पाच जणांना अटक

आयझॉल – मिझोराममधून तब्बल 31 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली. मोहम्मद नझिमुल हुसैन बारभुईया, अब्दुल कलाम लस्कर, कुतबुल आलोम लस्कर आणि सुकुर अली मुझुमदा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की,मिझोराम उत्पादन शुल्क आणि अंमली पदार्थ विभागाने एका गुप्त माहितीच्या आधारे आयझॉलमधील दोन ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत एकूण 6.05 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले.
पहिल्या कारवाईत बावंगकाऊन भागातून शनिवारी सुमारे 248 ग्रॅम हेरॉईन जप्त करत एका कथित व्यापाऱ्याला अटक करण्यात आली. यानंतर दुसऱ्या कारवाईत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी झेमाबाक परिसरातील एका ट्रकमधून 5.8 किलो हेरॉईन जप्त केले.
यावेळी चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, गेल्या आठवड्यात राज्य पोलिसांनी 15 कोटींचे 3 किलो हेरॉईन बाळगल्याप्रकरणी दोन आसाम रहिवाशांना अटक केली होती.





