पुणे : झपुर्झा कला आणि संस्कृती संग्रहालयाने इंडिया फाउंडेशन फॉर द आर्ट्स (IFA) आणि ARISA फाउंडेशनच्या सहकार्याने ७ सप्टेंबर २०२५ रोजी आपल्या ९ व्या गॅलरीमध्ये “Her Canvas, Her City” या चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्रामध्ये गायत्री तांबे देशपांडे, वैशाली ओक आणि शिल्पा जोगळेकर या महिला कलाकारांचा सहभाग होता. या चर्चासत्राचे संचालन प्रफुल्ल बोत्रे यांनी केले. शैक्षणिक आणि सांस्कृतिक मंच अशी ओळख असलेल्या झपुर्झातर्फे कलाविषयक विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या चर्चासत्राच्या निमित्ताने पुण्याच्या सर्जनशील वारशामध्ये महिला कलाकारांनी दिलेले योगदान, याबाबतच्या संवादासाठी झपुर्झाने व्यासपीठ उपलब्ध करून दिले. चर्चा सत्रातील कलाकारांनी झपुर्झासारख्या संस्कृती आणि कलेला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या स्थानांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, कलाक्षेत्रासाठी सोशल मीडिया दुधारी तलवारी असून त्यावरून कलेला कौतुक मिळतेच, पण तितकेच लवकर ते निघूनही जाते. त्यामुळे या आभासी जगाचा वापर योग्य पद्धतीने करायला हवा, सर्व प्रकारच्या कलांनी आर्ट गॅलरीच्या भिंती ओलांडून सार्वजनिक ठिकाणीही पोहोचण्याची गरज आहे, या विषयावर चर्चा झाली. तर, सोबतच पारंपरिक कला प्रकारांना तंत्रज्ञान, AI मदत करू शकतात, पण शेवटी, कोणत्याही कलेचा उगम हा मानवी अनुभव विश्वातूनच येतो. हे आणि असे अनेक मुद्दे या चर्चेमधून मांडले गेले. ही चर्चा झपुर्झा संग्रहालयाच्या ‘पुण्याचा कलात्मक वारसा : भाग ३ : पुण्यातील महिला कलाकार’ या प्रदर्शनासोबत आयोजित करण्यात आली होती. हे प्रदर्शन १० सप्टेंबर २०२५ पर्यंत सुरू राहणार असून झपुर्झा येथे ते सर्वांना पाहता येईल. या प्रदर्शनात सिरॅमिक्स, टेक्स्टाईल्स, चित्रे आणि इलस्ट्रेशन्स यांचा सामावेश असून, यामध्ये पुण्याच्या कला इतिहासाला महिलांच्या दृष्टिकोनातून नव्या अर्थाने मांडले गेले आहे.