झपूर्झा म्युझियम ऑफ आर्ट अँड कल्चरतर्फे “आ मोरी बंगला” प्रदर्शनाचे गॅलरी नं. ७ मध्ये उद्घाटन

पुणे : झपूर्झा म्युझियम ऑफ आर्ट अँड कल्चरमध्ये गॅलरी नं. ७ मध्ये “आ मोरी बंगला” या नव्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनाद्वारे बंगालच्या कला व संस्कृतीतील विविधता आणि सर्जनशीलतेचा उत्सव साजरा करण्यात आला आहे. प्रख्यात कथक नृत्यांगना गुरु शमा भाटे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी संस्थापक अजित गाडगीळ आणि रेणु गाडगीळ उपस्थित होते.
क्युरेटर मृदुछंदा सिन्हा यांनी साकारलेल्या या प्रदर्शनात बंगालमधील कला, हस्तकला व सांस्कृतिक अभिव्यक्तीचा अनोखा मेळ पाहायला मिळतो. वस्त्रकला, चित्रकला, धार्मिक विधींसाठी वापरली जाणारी साधने तसेच सजावटी कलावस्तूंपर्यंत या प्रदर्शनात समावेश आहे. यामधून बंगालचा बहुपेडी इतिहास आणि भारताच्या सांस्कृतिक परंपरेतील त्याचे मोलाचे योगदान अधोरेखित केले गेले आहे.
प्रसंगी बोलताना गुरु शमा भाटे यांनी बंगालच्या कलात्मक परंपरांनी पिढ्यान्पिढ्या कलाकारांना प्रेरित केले असून आजही ती प्रेरणा तितकीच महत्त्वाची असल्याचे सांगितले. क्युरेटर मृदुछंदा सिन्हा यांनी हे प्रदर्शन म्हणजे बंगालच्या सौंदर्यदृष्टीचा प्रवास असल्याचे स्पष्ट केले—जेथे परंपरा, प्रतीकात्मकता आणि आधुनिकतेचा सुंदर संगम दिसून येतो.
या प्रदर्शनाची अधिक सखोल ओळख करून देण्यासाठी शनिवार, ४ ऑक्टोबर रोजी दुपारी १:३० वा. आणि सायं. ५:३० वा. गॅलरी नं. ७ मध्ये क्युरेटर मृदुछंदा सिन्हा यांच्याकडून विशेष वॉकथ्रू आयोजित करण्यात येणार आहेत. या वेळी रसिक प्रेक्षकांना प्रदर्शनातील कलावस्तू, त्यामागील परंपरा व कथा यांची थेट माहिती मिळण्याची संधी मिळेल.
“आ मोरी बंगला”च्या माध्यमातून झपूर्झा पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक व सांस्कृतिक संवाद केंद्राच्या भूमिकेला अधोरेखित करत आहे. भारताच्या विविधतेने नटलेल्या कलात्मक वारशाचा अनुभव घेण्यासाठी रसिकांना आमंत्रित करण्यात येत आहे. हे प्रदर्शन झपूर्झा म्युझियम ऑफ आर्ट अँड कल्चरच्या गॅलरी नं. ७ मध्ये सर्वांसाठी खुले आहे.





