पुणे – शहराचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्थेच्या हेरिटेज वास्तूचे जतन व संवर्धनासाठी महापालिकेकडून पुढाकार घेतला आहे. यासाठी 67 लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे. त्यास नुकत्याच झालेल्या स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांनी दिली.
कांबळे म्हणाले, डेक्कन कॉलेजची वास्तू ही ग्रेड-1 दर्जाची असून 1864 साली बांधण्यात आली आहे. ही वास्तू स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमूना असून याठिकाणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, इतिहास तज्ज्ञ व्हि. के. राजवाडे, गोपाळ गणेश आगरकर, भांडारकर संस्थेचे आर. जी. भांडारकर, गुरुदेव रानडे यासारख्या नामवंत व्यक्तींनी शिक्षण घेतले आहे. या वास्तूचे जतन व संवर्धनासाठी पालिकेकडून हा निधी देण्यात येणार आहे. या निधीमधून सागवानी लाकूड कामातील कलाकुसरीचे काम केले जाणार आहे. तसेच चुन्यातील प्लास्टर करणे, लाकडावरील रंग घासून काढणे, लीड शीट पुरविणे आणि बसविणे, दगडी बांधकामाला वॅकर केमिकल लावणे, जीआय पत्रे पुरविणे आणि बसविणे आदी कामे केली जाणार आहेत.