अवजड वाहने दिसू लागली….! प्रवेश बंदी मोडणाऱ्या चालक-मालकांविरोधात पुणे पोलिसांनी दाखल केले १८ गुन्हे

पुणे – शहरातील ३२ महत्त्वाच्या चौकांवर प्रवेश निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या अवजड वाहनांच्या चालक आणि मालकांविरोधात पुणे पोलिसांनी १८ गुन्हे दाखल केले आहेत. गेल्या चार दिवसांत अवजड वाहनांमुळे दोन महिलांना आपले प्राण गमवावे लागल्यानंतर पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
याबाबत अपर पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) मनोज पाटील म्हणाले की, ११ जून रोजी घडलेल्या अपघातानंतर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. या घटनेत २९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. तसेच तिच्या सासऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. हा अपघात गंगाधाम चौकात घडला, जेथे अवजड वाहनांना प्रवेश बंदी आहे.
पाटील म्हणाले की, मोटार वाहन कायद्यानुसार दंड आकारण्यात आले असतानाही चालक निर्बंधांकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम २८१ (मानवी जीवितास धोका निर्माण करणे) आणि कलम २२३ (सार्वजनिक अधिकाऱ्याने जाहीर केलेल्या आदेशाचे उल्लंघन करणे) अंतर्गत कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
वाहतूक पोलिसांनी मालवाहू ट्रक, टँकर, कंटेनर, बसेस, क्रेन्स, ट्रेलर्स, एक्स्कॅव्हेटर, सिमेंट मिक्सर आणि इतर मल्टी ॲक्सेल वाहनांना डेक्कन जिमखाना, लक्ष्मी रोड, टिळक रोड, शिवाजी रोड, बाजीराव रोड, शिवाजीनगर, सर्व पेठांचा भाग, पर्णकुटी, कोरेगाव पार्क, ब्रेमेन चौक आदी ठिकाणी म्हणजेच शहराच्या मध्यवर्ती आणि रेड झोन परिसरात प्रवेशबंदी केली आहे.
ही कारवाई वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी नागरिकांच्या सल्ल्यानुसार करण्यात आली आहे. वेळोवेळी असे आढळले आहे की, वाहन चालक हे निर्बंध पाळत नाहीत आणि त्यामुळे गंगाधाम चौक, सातारा रोड, पर्वती, वारजे माळवाडी, पौड फाटा यांसारख्या ठिकाणी अपघात होतात. त्यामुळे प्रवेश बंदी मोडणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाईची गरज आहे. तसेच गंगाधाम चौक आता रेड झोन यादीमध्ये समाविष्ट करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चौकट : मार्केटयार्ड परिसरातील गंगाधाम चौकात बुधवारी ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील महिला दीपाली सोनी( २९) हीचा मृत्यू झाला होता. ती तीचे सासरे जगदीश सोनी हे गंभीर जखमी झाले होते. मागील पंधरा दिवसांत जड वाहनांच्या धडकेमध्ये तब्बल ११ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पुणेकरांकडून उमटत असलेल्या तीव्र प्रतिक्रीयांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.





