Heavy snowfall in Kashmir : काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी, उड्डाणे रद्द; श्रीनगरमध्ये उणे 4 डिग्री तापमान

Heavy snowfall in Kashmir : देशात सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. त्यातच काश्मीरमधील अनेक भागात जोरदार बर्फवृष्टी होत असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याची राजधानी श्रीनगरमध्ये सर्वत्र बर्फाची पांढरी चादर पसरली आहे. काश्मीरच्या राजौरीमध्येही रस्त्यांपासून झाडांपर्यंत सर्वत्र पांढऱ्या शुभ्र बर्फाची चादर आहे. हिमालयातील वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे काश्मीरच्या बहुतांश भागात बर्फवृष्टी होत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
काश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीरमध्ये प्रचंड हिमवृष्टीमुळे 7 उड्डाणे रद्द करण्यात आली असून इतर उड्डाणांचे ऑपरेशन सध्या स्टँडबायवर ठेवण्यात आले आहे. ते म्हणाले की, सतत बर्फवृष्टीमुळे इतर उड्डाणे टेक ऑफ होतील की रद्द होतील याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी नाही. याशिवाय जम्मू-श्रीनगर महामार्ग एका बाजूने वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला असून प्रवाशांना शिस्तीचे पालन करून काळजीपूर्वक वाहन चालवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरमध्ये 4 इंचांपेक्षा जास्त आणि काश्मीरच्या वरच्या भागात 2 ते 3 फूट बर्फवृष्टी झाली आहे. ताज्या बर्फवृष्टीमुळे, श्रीनगरमध्ये दिवसाचे तापमान 1 अंशाने घसरले आणि रात्री ते आणखी घसरेल.
हवामान खात्याच्या मते, पुढील 3 दिवसांत श्रीनगरचे किमान तापमान -2.0 ते -4.0 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. त्याचबरोबर कमाल तापमान 6 ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. राजधानीत ५ फेब्रुवारीलाही ढगाळ वातावरण राहील. तथापि, 6 फेब्रुवारीपासून हलका सूर्यप्रकाश अपेक्षित आहे.




