मुंबई – राज्यात अतिवृष्टीमुळे ८३ लाख ७८ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. त्यामध्ये १७ जिल्ह्यांत १० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाले आहे. मराठवाड्यासह राज्यातील अन्य भागांत गेल्या आठ दिवसांपासून अति मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेती आणि नागरी भागांचे नुकसान झाले आहे. राज्यात मंत्र्यांनी पूरग्रस्त भागांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली जात आहे.कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर, लातूर भागात पाहणी केली, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका आणि धाराशिव जिल्ह्यांत पूरस्थितीची पाहणी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिवमधील परांडा येथे पूरस्थितीची पाहणी केली. अतुल सावे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील पूरस्थितीची पाहणी केली. पालकमंत्री प्रताप सरनाईक, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार तानाजी सावंत यांच्यासह अधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली आहे.महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मत्स्यव्यवसाय मंत्री नीतेश राणे यांनी बैठका घेऊन पंचनाम्यांबाबत निर्देश दिले. धाराशिव, जालना, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आदी जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम असून तेथे पंचनाम्यांना अडथळा निर्माण झाला आहे. ३० जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पुरात वाहून ४५ जनावरांचा मृत्यू झाला असून ८ नागरिकांचा बळी गेला आहे.१७ जिल्ह्यांमध्ये १० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रांवरील पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यभरात विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे.सोलापूर उत्तर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, माढा, करमाळा, सांगोला, मंगळवेढा तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. सीना नदी धोका पातळीवर वाहत आहे. मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या या पावसामुळे पूर्व भागात ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे अनेक गावांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. यामुळे हजारो हेक्टरवरील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.