लोणी धामणी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील मांदळेवाडी, लोणी, रानमळा, वाळूंजनगर आणि धामणी परिसरात गेल्या पाच-सहा दिवसांपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सोमवारी (२६ मे) दुपारी चारच्या सुमारास वडगावपीर येथे झालेल्या जोरदार पावसामुळे ओढे-नाल्यांना पूर आला आणि सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक नागरिक गेल्या पाच-सहा दिवसांपासून घराबाहेर पडू शकले नाहीत. गुळवेवस्तीकडे जाणारा पूल पुराच्या पाण्यामुळे खचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. या पावसाने खरीप हंगामाच्या तयारीवर गंभीर परिणाम झाला असून, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने मशागत आणि पेरणीची कामे खोळंबली आहेत. कांदा, आंबा, भाजीपाला यासारख्या पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. ॲड. अवधूत तात्या राजगुडे यांनी सांगितले की, गेल्या ५० वर्षांत मे महिन्यात इतका जोरदार पाऊस पडल्याचा हा पहिलाच प्रसंग आहे, जो एक रेकॉर्ड ब्रेक पाऊस आहे. लोणी आणि वाळूंजनगर परिसरातील शेतकऱ्यांनीही नुकसानीचा आढावा घेण्यासाठी तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे. लोणीचे माजी सरपंच उद्धव लंके आणि तंटामुक्ती अध्यक्ष पिंटू पडवळ यांनी महसूल विभागाकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे. “पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली. हवामान खात्याने २७ मे रोजीही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून, आंबेगाव तालुक्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून, शेतकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला दिला आहे.