रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट विभागात मुसळधार पावसाचा अंदाज

पुणे – राज्यातील रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट विभागात पुढील ४८ तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना अॅरेंज अलर्ट दिला आहे.
मान्सूनने आज अरबी समुद्राचा आणखीन काही भाग, गुजरातचा उर्वरीत, राजस्थनचा काही तर मध्य प्रदेशसह पुर्व उत्तर प्रदेश, छत्तीसगड व झारखंडचा काही भाग आणि बिहारच्या आणखीन काही भाग व्यापला आहे. कमी दाबाचे क्षेत्राचे रूपांतर आता ठळक कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. तर दुसरे कमी दाबाचे क्षेत्र राजस्थानच्या मध्य भागात स्थिर आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस राज्यातील कोकण-गोव्यात बहुतांश भागात, विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा घाट विभागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई, सिंधूदुर्ग, नाशिक, कोल्हापूर घाट विभाग आणि छत्रपती संभाजीनगर, जालना तर विदर्भातील बहुतांश भागात पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी पडतील. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.





