Heavy Rain : ईशान्यकडील राज्यांमध्ये पावसाचा हाहाकार; 2 दिवसांत 30 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : ईशान्येकडील राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात रस्ते वाहून गेले आहेत, तर अनेक भागात भूस्खलन झाल्यामुळे त्या भागांचा राज्याच्या इतर भागांशी संपर्क तुटला आहे. सर्वाधिक फटका सिक्कीम आणि आसाम राज्याला पडला आहे. येथे अतिमुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.
सिक्कीमच्या अनेक भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. ईशान्येकडील अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी 30 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. येत्या काही दिवसांत सिक्कीममध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. आयएमडीने राज्यातील पावसाबाबत अलर्टही जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सिक्कीममध्ये सुरू असलेल्या पावसामुळे परिसरात 1500 हून अधिक पर्यटक अडकले आहेत. तर आठ जण बेपत्ता आहे. रेस्क्यू टीमकडून त्यांचा तपास केला जात आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे आठ पर्यटकांचा शोध घेण्यात अडचणी जाणवत आहेत. या भागात ढगफुटीमुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे, तीस्ता नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच लाचुंग रस्ता आज संध्याकाळी पूर्ववत करण्यात आला, परंतु पेगोंग (चुंगथांग) ते शिपग्यार, सांगकालांग मार्गे फिदांगला जाणारा रस्ता अनेक भूस्खलनांमुळे बंद आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.अरुणाचल प्रदेश आणि मेघालयात डोंगरातून येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे राज्यातील पूर परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितलं की, कामरूप महानगर जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.





