पुणे | घाटमाथ्यावर जोरदार पाऊस ; ताम्हिणी घाट विभागात १६८ मिमी पावसाची नोंद

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरात रविवारी पावसानेही सुट्टी घेतली. त्यामुळे काही भागात हवामान कोरडे होते, तर काही ठिकाणी भुरभुर पाऊस झाला. मात्र, घाट माथ्यावर पावसाचा जोर कायम असून, गेल्या २४ तासात ताम्हिणी घाट विभागात सर्वाधिक १६८ मिमी पावसाची नोंद झाली.
जुलै महिनाही संपत आला, तरी अद्याप शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलेला नाही. आजही बहुतांश भागात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पेरण्या करूनही पिकांना पुरेशे पाणी नसल्यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत आहे. आज दिवसभर तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या, तर काही भागात आकाश निरभ्र असल्याने पावसाने उघडीप दिली.
दुपारी चारनंतर काळे ढग भरून आले, त्यामुळे चांगला पाऊस होईल, असे वाटत असताना पावसाने हुलकावणी दिली. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत कोरेगांव पार्क येथे सर्वाधिक ३, पाषाण परिसरात २, वडगावशेरी आणि शिवाजीनगर परिसरात १ मिमी पावसाची नोंद झाली.
गेल्या 24 तासांत घाट विभागातील बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस झाला. ताम्हिणी घाट परिसरात १६८ मिमी पावसाची नोंद झाली असून, शिरगाव येथे ११४, धावडी परिसरात १११, धारावी येथे ९६, भिरा येथे ८४, तर लोणावळा परिसरात ६० मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, पुढील दोन दिवस घाटमाथ्यावर जोरदार, तर शहर परिसरात हलक्या ते मध्यम सरी पडतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.





