राज्यात जोरदार पावसाची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Maharashtra Rain Alert | गेले काही दिवस पावसाने उघडीप दिल्याचे चित्र पाहायला मिळत होते. त्यानंतर आज सकाळपासूनच पावसाने मुंबईसह उपनगरात आणि राज्यातील विविध भागात जोरदार हजेरी लावली. पुण्यात देखील सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे.
भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या इशाऱ्यानुसार मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, सातारा, आणि कोल्हापूरच्या घाट भागात पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस पडेल. काही भागात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. याशिवाय मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकणात जोरदार पावसाने हजेरी लावली असून रायगडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली गेले असून गावांचा संपर्क तुटला आहे. रायगडमध्ये जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज माणगाव, तळा, रोहा, पाली, महाड आणि पोलादपूर या सहा तालुक्यांतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना 15 जुलै 2025 रोजी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.
या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता –
दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि नाशिक येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आह. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. विदर्भातील नागपूर, गोंदिया, चंद्रपूर व अमरावती जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडणार आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळणार आहे. Maharashtra Rain Alert |
हेही वाचा :
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला बॉम्बस्फोटाची धमकी ; बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल, गुन्हा दाखल





