Maharashtra Rain : राज्यात दमदार पावसाची शक्यता; पेरणीची घाई नको; हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Rain : मागील काही दिवसांपासून सर्व दूर पूर्व मौसमी पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. जवळपास सर्व विभांगामध्ये १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडल्याचा अंदाज आहे. यापूर्वी मान्सुनचे आगमन दि. १ जून रोजी केरळमध्ये होत असे आणि ७ ते १० जून दरम्यान मान्सून महाराष्ट्र व्यापत असे. यावर्षी मान्सूनचे आगमन हे केरळमध्ये २४ मे तर महाराष्ट्रात २५ मे ला झालेले आहे.
पुढील ४ ते ५ दिवस महाराष्ट्रात दमदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेली आहे. त्यामुळे किमान वापसा येण्यास ७ ते ८ दिवस लागण्याची शक्यता असल्याने शेतकरी बंधूंनी पेरणीची घाई करू नये. शेतामध्ये पावसाचे पाणी साठून राहणार नाही यासाठी व अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी शेतातून पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था करावी करावी.
वापसा आल्यानंतर कुळवाने मशागत करावी म्हणजे उगवलेल्या ताणाचा बंदोबस्त होईल व शेत पेरणी योग्य होईल. हवेतील उष्णता मृग नक्षत्राच्या आसपास कमी होऊन जमिनीतील किडीचा मुख्य पिकांवर प्रादुर्भाव होणार नाही व तणाचाही प्रार्भाव कमी होईल. खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी दर्जेदार व प्रमाणित बियाण्याचे नियोजन करावे, असा सल्ला महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने दिला आहे.
जमिनीतील तापमान कमी झालेले नसतानाही कपाशीची लागवड केल्यास कीड व रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते, त्यामुळे तापमान कमी झाल्याशिवाय लागवडीची घाई करू नये. कोरडवाहू भागात ज्या ठिकाणी जमिनीची पूर्व मशागत झालेली असल्यास आणि पेरणी योग्य १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, अशा ठिकाणी वापसा आल्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे खाली नमूद केल्याप्रमाणे पेरणी करावी.
हलकी जमीन मटकी, मध्यम व भारी जमीन मूग, चवळी, सूर्यफूल, तूर. हुलगा, उडीद, बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे. परंतु जमिनीचे तापमान अद्यापही कमी झालेले नाही. आशा परिस्थितीत लागवड केल्यास कोड व रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते, त्यामुळे फळपिकांच्या लागवडीची घाई करू नये. जनावरांच्या पिण्यात दूषित किंवा गाळमिश्रण पाणी जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
जनावरांचे जंत निर्मूलन करून घ्यावे. कोवळ्या गवतामुळे होणारी बुळकांडी रोगाकरीता सल्फा गोळ्याचा वापर करावा. जनावरांना मोकळ्या जागेत बांधू नये. त्यांना गोठा, शेड किंवा मजबूत इमारतीत ठेवावे. पावसाचे वातावरण आणि विजेचा गडगडाट होत असल्यास शेतातील कामकाज त्वरित थांबवून जनावरांना बंदिस्त आणि सुरक्षित ठिकाणी हलवावे. पाणी जमिनीत जास्त मुरेल व वाहून जाणार नाही, याचा प्रयत्न करावा. पावसाचे घराच्या छतावर पडणारे पाणी पाइपद्वारे एखाद्या टाकीत जमा करावे.




