पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

पुणे – राज्यात पुढील दोन ते तीन दिवस चांगल्या पावसाची शक्यता असून, कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामध्ये सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील घाट विभागात पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मागील आठवड्यात कमी झालेला पावसाचा जोर पुन्हा वाढू लागला असून, दि. २७ आणि २८ ऑगस्ट रोजी राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पाऊस पडेल, तर काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दि. २७ ऑगस्ट रोजी पालघर, रायगड, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, पुणे आणि कोल्हापूर घाट विभागांत अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दि. २७ ते २९ ऑगस्टदरम्यान धुळे, नंदुरबार, जळगाव यांसह विदर्भातील उर्वरीत जिल्ह्यांसह मराठवाड्यात मेघगर्जना, ३० ते ४० ताशी वेगाने वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. त्यामुळे या जिल्ह्यांनाही हवामानशास्त्र विभागाने यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे हा आठवडा चांगला पाऊस पडणार असून, काही जिल्ह्यांत शेतकऱ्यांना दिलासा देणारा, तर काही ठिकाणी नुकसानीचा ठरू शकतो.





