Vidarbha Weather Update : विदर्भातही पावसाचा जोर.! तुफान पावसामुळे जनजीवन विस्कळीत; रेल्वे वाहतुकीला बसला फटका

Vidarbha Weather Update – हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भातही मुसळधार पावसाने दमदार मारा केला. रविवारच्या रात्री पासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीवर देखील झाला असून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या उशीराने प्रवास करत आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, नागपूरसह इतर बहुतांश जिल्ह्यातील नदी नाल्यासह मुख्य रस्त्याला अक्षरश: नदीचे स्वरूप आले.
पुढील काही दिवस पावसची ही परिस्थिती अशीच कायम असणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. परिणामी संभाव्य पावसाचा इशारा लक्षात घेता सुरक्षिततेच्या अनुषंगाने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन स्थानिक जिल्हा प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
अकोल्यात गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांपैकी एक असलेल्या दुर्गाचौक ते जठारपेठ रस्त्याला अक्षरश: नदीचे स्वरूप आले. महापालिकेने केलेला नालेसफाईचा दावा या रस्त्यावर साचलेल्या पाण्याने धुवून काढला. या पावसामुळे सर्वत्र एकच दाणादाण उडवली असल्याचे चित्र आहे.
काल रात्रभरापासून सुरू असलेल्या मूसळधार पावसामुळे अकोला पोलीस भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली. आज 8 जुलै रोजी घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी आता पुढं 11 जुलै रोजी असणार आहे. आज 8 जुलै रोजी तब्बल 1 हजार 154 महिला उमेदवारांची मैदानावरील शारीरीक चाचणी होणार होती, मात्र पावसामूळे ही मैदानी चाचणी रद्द करण्यात आली आहे.
मागील दोन दिवसात भंडारा जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. अशात आज दुपारी घराजवळ काम करीत असताना पावसानं जीर्ण झालेली घराची भिंत अचानक इसमाच्या अंगावर कोसळली. या घराच्या मलब्याखाली दबून इसमाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील करांडला या गावात घडली. योगेश देशमुख (३५) असे मरण पावलेल्याचे नाव आहे.





