हवालदिल बळीराजाला मदतीची गरज

पुरंदर – तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
तालुक्यात तब्बल दोन महिन्यांपासून कधी संततधार, तर कधी मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे तालुक्यातील ओढे, नाले, नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या आहेत. सतत बरसणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील शेतांमध्ये पाणी साचलेले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या बाजरीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बाजरीच्या पिकाचे काढणी केलेल्या कणसांना शेतातच राहिल्यामुळे कोंब फुटले आहेत.
भुईमुगाच्या पिकाचे शेतात पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असून, कांदा पीक अक्षरशः सडून गेले आहे. भाजीपाल्याच्या नुकसानीची तर गणनाच नाही. ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात भाजीपाला लागवड केली होती त्या शेतामध्ये फक्त पाणीच पाणी झाले आहे.
फळबागा उत्पादक शेतकऱ्यांचे दुःख तर वेगळेच आहे. फळबागांचे ढगाळलेले वातावरण, सतत बरसणारा पाऊस आणि शेतात साचलेले पाणी यामुळे फळबागा उत्पादक शेतकरी हैराण झालेले आहेत. एकंदरीत पुरंदर तालुक्यात सतत बरसणाऱ्या पावसामुळे बळीराजा हवालदिल झालेला आहे.
वर्षभरातील सर्वांत मोठा असणारा दीपावली उत्सव यावेळी तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना साजरा करता आला नाही. बहुसंख्य शेतकऱ्यांच्या घरात दिवाळीचा दिवा पेटला नाही. अजूनही पाऊस अधूनमधून पडत आहे आणि शेतातले पाणी साचलेले आहे, त्यामुळे खरिपासोबत आता रब्बी हंगामही हातातून जातो की काय, अशी चिंता शेतकऱ्यांना भेडसावू लागली आहे.
रब्बी हंगामासाठी डोक्यावर उभा राहिलेला कर्जाचा डोंगर फेडायचा कसा आणि रब्बी हंगामासाठी भांडवल आणायचे कुठून, या विवंचनेत सध्या पुरंदर तालुक्यातील बळीराजा आहे आणि याकडे प्रशासकीय यंत्रणा मात्र मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करत आहे. ढिम्म प्रशासकीय यंत्रणेला तब्बल एक महिना उलटूनही पंचाने करायलाच वेळ अपुरा पडत आहे. अजून शेतांचे पंचनामे झाले नाही तर नुकसान भरपाई येणार कधी, हा तर संशोधनाचाच विषय बनलेला आहे. तालुक्यातील शेतीच्या नुकसानीची लवकरात लवकर तातडीने पंचनामे करणे गरजेचे आहे व फक्त पंचनामे तातडीने सरकारकडून मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे.





