Nagar | भंडारदरा धरणाच्या पाणलोटात जोरदार पाऊस

राजूर, (वार्ताहर)- गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाला पुन्हा जोरदार सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे भातशेतीला संजीवनी मिळाली आहे. तसेच धरणातही पाण्याची आवक वाढली आहे.
जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या भंडारदरा पाणलोट क्षेत्राला संततधार पाऊस सुरु झाल्याने शेतकरी सुखावला आहे . या पावसामुळे आदिवासी शेतकरी बांधवांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कमी-अधिक प्रमाणात पावसाची संततधार सुरूच असल्याने वातावरणात देखील गारवा निर्माण झाला, तर निसर्ग सौंदर्य देखील खुलले आहे. या पावसाच्या पाण्याने डोंगर दऱ्यातील झरे वाहते झाले.
दरवर्षी प्रथम भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडतो. त्यावेळी उर्वरित जिल्हा मात्र पावसाच्या प्रतीक्षेत असतो. यंदा मात्र जिल्हाभर पाऊस कोसळत असताना भंडारदरा पाणलोट क्षेत्र पावसाच्या प्रतीक्षेत होता. परंतु ही प्रतीक्षा संपली असून, पावसाला सुरुवात झाली आहे.
भंडारदरा धरणात 4175 दलघफू तर निळवंडे धरणात 1393 दलघफू इतका पाणीसाठा झाला आहे. आज रविवार सुट्टी असल्याने भंडारदर्याला पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. पिंपळगाव खांड धरण भरल्याने 500 क्यूसेकने मुळा नदी वाहत आहे. त्यामुळे मुळा धरणातील पाण्याच्या साठ्यातही झपाट्याने वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.





