इंदापुरात पहिल्यांदाच मुसळधार पाऊस; व्यापारी संकुलात पाणी शिरल्याने नुकसान

इंदापूर : इंदापूर शहरात रविवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे बस स्थानक परिसरातील व्यापारी संकुलाला नदी-नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले. सोमवारी सकाळी या परिसरात एक ते दोन फूट पाणी साचल्याने दुकानांमध्ये पाणी शिरून व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
बस स्थानकातील तळमजल्यावरील दुकानांसमोर साचलेल्या पाण्यामुळे अनेक दुकानांमध्ये पावसाचे पाणी घुसले. सततच्या पाणी साचण्याच्या समस्येमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत असल्याने यावर नगरपरिषदेने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी मोबाइलच्या सर्व वस्तूंचे घाऊक विक्रेते रमेश पटेल यांनी केली.
शहरातील इतरही अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने घरांमध्ये आणि दुकानांमध्ये नुकसान झाले. दरम्यान, इंदापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी पावसातही तातडीने कार्यवाही करत बस स्थानक आणि पाणदारा परिसरातील साचलेले पाणी बाहेर काढले, अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी दिली.





