Weather Update : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; जगबुडी नदीची इशारा पातळीकडे वाटचाल

रत्नागिरी – जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरुच असल्याने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने जोर धरल्याने जगबुडी नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरु झाली आहे. तसेच संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता चिपळूण शहरात राष्ट्रीय आपत्ती दलाची तुकडी दाखल झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात मंडणगड तालुक्यात १५७.०० मिमि एवढा पाऊस जास्त पडला आहे. तर सर्वात कमी पाऊस पडल्याची नोंद संगमेश्वर तालुक्यात करण्यात आली आहे.
पावसाने आपला जोर कायम ठेवल्याने जिल्ह्यातील खेड, चिपळूण तसेच राजापूर तालुक्याच्या ठीकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच जगबुडी नदी इशारा पातळीकडे जात असल्याने खेड व चिपळूण भागात पुराचे पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संभाव्य पुरस्थितीचा धोका लक्षात घेता. चिपळूण येथे राष्ट्रीय आपत्ती दलाची एक तुकडी दाखल झाली आहे. पावसाचा वाढता जोर लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहे.
चोवीस तासांत ८७२ मिमी पाऊस
रत्नागिरी जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसाने मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पोलखोल केली आहे. अनेक ठिकाणी करण्यात आलेल्या अर्धवट कामांमुळे वाहतुकदारांना व वाहनांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासात एकूण पाऊस ८७२.५१ मिमी एकूण तर सरासरी ९६.९४ मिमी एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.
वीज पडून एकाचा मृत्यू
रायगड जिल्ह्याला रविवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले. मुरुड, म्हसळा आण श्रीवर्धन तालुक्यात ३०० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. कर्जत तालुक्यातील बिरदोली गावात वीज पडून २५ वर्षीय तुरुणाचा मृत्यू झाला. सोमवारीही दिवसभर पावसाची संततधार कायम होती. त्यामुळे नदी किनाऱ्यांवरील गावांना तसेच डोंगर उतारावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.





