Weather update : राज्यभरात पावसाचे धुमशान; ‘या’ विभागात रेड अलर्ट जारी

मुंबई – राज्यात काही दिवसांपासून मुसळधार पावसाला पुन्हा सुरूवात झाली आहे. राज्यभरात पावसाने धुमशान घातल्याने अनेक ठिकाणी नदी नाले ओसांडून वाहत आहेत. तर अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. महाराष्ट्रात पुढील 3 दिवसांत म्हणजेच 11 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
पुढील तीन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीची देखील शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागर भागात तयार झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासांत तीव्र होत डिप्रेशनमध्ये रुपांतरीत होणार आहे.
कोकणात पालघर, ठाणे, रत्नागिरी, मुंबई, रायगडमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असल्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली असून या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.





