छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 7 नक्षलवादी ठार

रायपूर – छत्तिसगढमध्ये गुरूवारी सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झडली. त्यामध्ये ७ नक्षलींचा खात्मा करून सुरक्षा जवानांनी लक्षणीय कामगिरी केली. नारायणपूर जिल्ह्यातील अबुझमाड जंगलात सुरक्षा दलांनी पहाटेच्या सुमारास नक्षलवादविरोधी मोहीम हाती घेतली. त्या मोहिमेवेळी सुरक्षा जवानांना पाहून नक्षलींनी गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये काही काळ चकमक झडली.
ती थांबल्यानंतर चकमकस्थळी ठार झालेल्या नक्षलींचे मृतदेह आढळले. त्यांच्याकडील शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला. चकमक थांबल्यानंतरही संबंधित जंगलात सुरक्षा दलांनी काही काळ शोधमोहीम राबवली. नक्षलींच्या विरोधातील मोहिमेत पोलिसांचे डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान सहभागी झाले.





