Europe Heatwave : युरोपातली उष्णतेची लाट अधिक तीव्र; आणखी १ हजार जणांच्या मृत्यूची नोंद
ही उष्णतेची असाधारण लाट जागतिक वातावरण बदलाच्या परिणामाशिवाय असू शकत नाही, असे युरोपातल्या वर्ल्ड वेदर ऍट्रिब्युशन या संशोधकांच्या गटाने म्हटले आहे.

Europe Heatwave – युरोपात अजूनही तीव्र असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे फ्रान्समध्ये गेल्या आठवड्यात सुमारे एक हजार जण मरण पावल्याची नोंद झाली आहे. फ्रान्सच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
युरोपातल्या इतर प्रमुख शहरांमधील तापमान अजूनही नेहमीपेक्षा जास्त आहे. यामुळे जर्मनीमध्ये वणवे पेटले आहेत. रस्त्यावरील लोकांना उष्णतेच्या लाटेचा त्रास होऊ नये, म्हणून पोलिसांकडून लोकांवर पाण्याचे फवारे मारले जात आहेत.
रविवारी जर्मनीमध्ये रात्रीच्यावेळचे तापमान २९.४ अंश नोंदवले गेले. शनिवारी दिवसाचे कमाल तापमान ४१.५ अंश इतके नोंदवले गेले होते.
जर्मनीच्या काही भागात वणवे भडकले असून दुसऱ्या महायुद्धातील काही स्फोटकांचे या उष्णतेमुळे स्फोट झाल्याने हे वणवे भडकले आहेत. अग्नेय जर्मनीतल्या ट्रेसन भागात लागलेला वणवा अजूनही धगधगतो आहे.
फ्रान्समध्ये गेल्या आठवड्यात उष्णतेच्या लाटेमुळे किमान एक हजार जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राजधानी पॅरिसच्या आजूबाजूच्या परिसरातच हे मृत्यू झाले आहेत. बुधवारी ही मृत्यूंची संख्या १.२०० पेक्षा जास्त होती.
तर गेल्या दोन दिवसात ही संख्या वाढून १,४०० झाली आहे. गेल्या तीन दिवसात किमान एक हजार जणांचा मृत्यू झाला आहे, असे राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य एजन्सीने म्हटले आहे.
या उष्णतेच्या लाटेमुळे आग लागण्याची भीती असल्याने ग्रीसच्या प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर डेन्मार्कमध्ये गडगडाटासह मुसळधार पाऊस देखील झाला आहे.
वातावरण बदलाचा परिणाम
ही उष्णतेची असाधारण लाट जागतिक वातावरण बदलाच्या परिणामाशिवाय असू शकत नाही, असे युरोपातल्या वर्ल्ड वेदर ऍट्रिब्युशन या संशोधकांच्या गटाने म्हटले आहे.
जवळपास ५ दशकात पहिल्यांदाच इतकी प्रचंड उष्णतेची लाट युरोपात आली आहे. सुमारे २० वर्षांपुर्वी जेवढे कमाल तापमान असू शकले असते, त्याच्या २०० पट अधिक तापमान सध्या नोंदवले जाते आहे, असे या गटाने म्हटले आहे.





