महाराष्ट्र तापणार! पुढील काही दिवस धोक्याचे, हवामान विभागाचा इशारा
IMD Weather Forecast : भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि दक्षिण भारतात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

IMD Weather Forecast : देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमान झपाट्याने वाढताना दिसत आहे. विशेषत: उत्तर आणि मध्य भारतातील अनेक भागात तापमान सामान्यपेक्षा जास्त नोंदवले जात आहे. निरभ्र आकाश आणि पाश्चिमात्य विक्षोभ नसल्यामुळे मार्च महिन्यात पावसाची शक्यता कमी असून त्यामुळे तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने येत्या काही दिवसांत उष्णतेची तीव्रता वाढण्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने हिमाचल प्रदेश, राजस्थानचा पश्चिम भाग आणि गुजरात येथे ७ ते १० मार्चदरम्यान उष्णतेच्या लाटेचा अलर्ट जारी केला आहे. तसेच आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या काही जिल्ह्यांमध्येही उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
९ मार्च रोजी कोकण किनारपट्टी परिसरात तसेच ९ आणि १० मार्चला गुजरातच्या किनारी भागात तीव्र उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर दक्षिण आणि मध्य किनारी आंध्र प्रदेश, रायलसीमा आणि उत्तर तामिळनाडूतील काही भागात ७ आणि ८ मार्च रोजी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक भागातही तापमान वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
अमरावतीत 40.8 अंश तापमान
गेल्या काही दिवसांत गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारी भागात उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. राजस्थानमधील जैसलमेर आणि जोधपूर या वाळवंटी भागात तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, गेल्या २४ तासांत महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि राजस्थानच्या अनेक भागात कमाल तापमान ३७ ते ४१ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेले. महाराष्ट्रातील अमरावती येथे ४०.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
उत्तर भारतातही तापमान वाढ
उत्तर भारतातील हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पश्चिम राजस्थानमध्ये तापमान सामान्यपेक्षा ३ ते ७ अंश सेल्सिअस जास्त नोंदवले गेले आहे.
तसेच उत्तराखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, गुजरात तसेच कोकण आणि गोवा या भागांत तापमान सामान्यपेक्षा २ ते ५ अंश सेल्सिअस जास्त नोंदवण्यात आले आहे.





