Heatstroke Death : महाराष्ट्रात सूर्याचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून, अहिल्यानगर जिल्ह्यात उष्माघाताने (Heatstroke Death) दुसऱ्या बळीची घटना समोर आली आहे. पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील जिल्हा परिषद शाळेतील ५० वर्षीय शिक्षिका उषा पोपट फापाळे यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. उषा फापाळे या नेहमीप्रमाणे गारगुंडी येथून आपल्या दुचाकीवरून शाळेत गेल्या होत्या. शाळा दुपारी १२ वाजता सुटल्यानंतर त्या घरी परतत होत्या. त्यावेळी उन्हाचा तडाखा अत्यंत प्रखर होता. घरी पोहोचल्यानंतर त्यांना अचानक अस्वस्थता जाणवू लागली. अशक्तपणा, चक्कर येणे अशी उष्माघाताची लक्षणे दिसू लागली. त्यांची प्रकृती बिघडत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने कान्हूर पठार येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी अहिल्यानगर येथे हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यांची प्रकृती वेगाने खालावत होती. उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयचे आरोग्य अधिकारी डॉ. ऋत्विज म्हसके खिलारी यांनी दिली. Heatstroke Death गेल्या आठवड्यात पहिला बळी अहिल्यानगर जिल्ह्यात उष्माघाताने ही दुसरी घटना आहे. गेल्या आठवड्यात पारनेर तालुक्यातील ढवळपुरी (माळवाडी) येथे ४५ वर्षीय हर्षदा रावसाहेब चौधरी या महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाला होता. हर्षदा दुपारच्या कडक उन्हात शेतात मका कापत होत्या. त्यावेळी त्यांना चक्कर आली आणि उपचार मिळण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात तापमान वाढले असून, अहिल्यानगरसह अनेक जिल्ह्यांत उन्हाचा तडाखा जीवघेणा ठरत आहे. आरोग्य विभागाने नागरिकांना दुपारच्या उन्हात बाहेर पडू नये, पुरेसे पाणी प्या, हलके कपडे घाला आणि शक्यतो घरात राहण्याचा सल्ला दिला आहे. दोन्ही घटनांमुळे स्थानिक प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, उष्माघात टाळण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली जात आहे. तरीही प्रखर उन्हाळ्यात काम करणाऱ्या शेतकरी, शिक्षक आणि इतर नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.