Priyanka gandhi : नवीन शिक्षणमंत्र्यांबाबत प्रियांका गांधी लोकसभेत नेमकं काय म्हणाल्या?; मोठा गदारोळ आणि वक्तव्य रेकाॅर्डवरून हटवलं
Priyanka gandhi : लोकसभेत पावसाळी अधिवेशनात मंगळवारी 'सार्वजनिक परीक्षा (अनुचित मार्गांना प्रतिबंध) दुरुस्ती विधेयक, २०२६' या विषयावर झालेल्या चर्चेदरम्यान काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी सरकारवर घणाघाती टीका केली.

Priyanka gandhi : लोकसभेत पावसाळी अधिवेशनात मंगळवारी ‘सार्वजनिक परीक्षा (अनुचित मार्गांना प्रतिबंध) दुरुस्ती विधेयक, २०२६’ या विषयावर झालेल्या चर्चेदरम्यान काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी सरकारवर घणाघाती टीका केली.
प्रियंका गांधीआणि नवे केंद्रीय शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. शिक्षणमंत्र्यांविषयी प्रियंका गांधी यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र गदारोळ झाला. अखेर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संबंधित वक्तव्य सभागृहाच्या कामकाजाच्या नोंदीतून वगळण्याचे आदेश दिले.
#WATCH | Reacting to the statement by Congress MP Priyanka Gandhi Vadra on him, Union Minister Pralhad Joshi says, “Priyanka ji should have authenticated her statements. Action should be taken regarding the misinformation being spread. Can one simply say anything and get away… https://t.co/FyXSHeYmpu pic.twitter.com/bvODiUTZZ3
— ANI (@ANI) July 28, 2026
शिक्षण क्षेत्रावरील चर्चेदरम्यान प्रियंका गांधी यांनी पंतप्रधानांनी नव्या शिक्षणमंत्रिपदी अशा व्यक्तीची नियुक्ती केल्याचा आरोप केला, ज्यांनी एका गर्भवती बलात्कार पीडितेच्या दोषींना मुक्त करण्यास सहमती दर्शविली होती. या विधानावर सत्ताधारी सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला.
यावेळी अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रियंका गांधी यांना कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय शिक्षणमंत्र्यांवर अशा प्रकारचे आरोप करू नयेत, असे स्पष्ट शब्दांत सुनावले आणि संबंधित वक्तव्य कामकाजातून वगळण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रियंका गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांनी तातडीने माफी मागावी, अशी मागणी केली. त्यावर प्रियंका गांधी यांनी, “मी त्याचे पुरावे तुम्हाला पाठवते,” असे उत्तर दिले.
#WATCH | Delhi | In Lok Sabha, Congress MP Priyanka Gandhi Vadra says, ” The Prime Minister appointed a new Education Minister, a person who expressed consent and even happiness over the release of those convicted of raping a pregnant woman… ”
Objecting to this, Union Minister… pic.twitter.com/ahJOgjgQDI
— ANI (@ANI) July 28, 2026
यावेळी सरकारच्या शिक्षण धोरणावर टीका करताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, रोजगारनिर्मिती करणारी सर्व क्षेत्रे कमकुवत झाली आहेत. प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांमुळे कोट्यवधी विद्यार्थ्यांचे नुकसान झाले, मात्र एकाही दोषीला शिक्षा झालेली नाही. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (NTA) माध्यमातून परीक्षा प्रणालीचे अतिकेंद्रीकरण करण्यात आले असून शिक्षण संस्थांमध्ये विशिष्ट विचारसरणीच्या लोकांची नियुक्ती करून शिक्षणव्यवस्था कमकुवत करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
शिक्षणासाठीचा अर्थसंकल्प दरवर्षी कमी होत असल्याचा दावा करत त्यांनी देशातील तरुणांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास उडाला असल्याचे सांगितले. हा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी विद्यमान चौकटीच्या पलीकडे जाऊन ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचाही उल्लेख करत प्रियंका गांधी म्हणाल्या की, त्यांनी “लाजिरवाण्या परिस्थितीत” राजीनामा दिला, मात्र संसदेत त्यांचे सुपरस्टारप्रमाणे स्वागत करण्यात आले. “ज्या वेळी त्यांचा सत्कार होत होता, त्याच वेळी महाराष्ट्रातील एका कुटुंबावर मुलीच्या आत्महत्येमुळे शोककळा पसरली होती. जिथे लाज वाटायला हवी, तिथे जल्लोष केला जात होता,” अशी टीकाही त्यांनी केली.





