Weather update : महाराष्ट्रावर गेल्या काही दिवसांपासून घोंघावणारं अवकाळी पावसाचं संकट टळलं आहे. मात्र, राज्यात उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सध्या राज्यातील वाढत्या तापमानामुळे प्रचंड उकाडा जाणवत असून नागरिक हैराण झाले आहेत. अशातच पुढील काही दिवस राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा पारा चांगलाच वाढणार असून कमाल तापमान 35 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज, 13 मे रोजी राज्यातील 12 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामान कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट हवामान कायम राहणार आहे. अवकाळी पावसाचा धोका कमी झाला असला तरी उन्हाची तीव्रता वाढली आहे. आज कमाल तापमान 32 ते 36 अंशांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. मुंबईसह ठाणे आणि पालघरच्या काही भागांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात ‘हिट वेव्ह’चा इशारा उत्तर महाराष्ट्रात आता उष्णतेच्या लाटेचं संकट गडद होत आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत पुढील 48 तास तीव्र उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने या भागांसाठी ‘हिट वेव्ह’चा इशारा दिला असून तापमान 44 अंशांपर्यंत पोहोचू शकतं, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे-अहिल्यानगरमध्ये उन्हाचा तडाखा पुणे आणि अहिल्यानगरमध्ये उष्णतेचा मोठा फटका बसणार आहे. पुढील 48 तासांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून कडक ऊन जाणवेल. या भागातील तापमान 36 ते 42 अंशांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूरमध्येही तापमानात वाढ होणार आहे. मराठवाड्यात तापमान 44 अंशांपर्यंत मराठवाड्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यांत आज तीव्र उकाडा जाणवणार आहे. कमाल तापमान 44 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असून किमान तापमान 25 ते 30 अंशांच्या दरम्यान राहील. विदर्भातही वाढणार तापमान विदर्भात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वादळी पावसाचा जोर आता कमी झाला आहे. मात्र, उष्णतेचा प्रभाव वाढू लागला आहे. विदर्भातील तापमान 40 ते 45 अंशांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. अकोला आणि अमरावती जिल्ह्यांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता असून या भागांसाठी यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. हेही वाचा : Mhaswad Temperature : म्हसवडचा पारा ४१ अंशावर! निसर्गाने करून दिली लॉकडाऊनची आठवण; जनजीवन विस्कळीत